दोन बाळंतीणींना रुग्णवाहिका मिळाली नाही:डिझेल, ड्रायव्हर नसल्याचे कारण; आमदार चित्रा वाघ संतापल्या

[ads1]


अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) दोन बाळंतीणींना रुग्णवाहिका न मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी रुग्णालयाला भेट दिली असता, त्यांच्यासमोरच ही घटना उघड झाली. रुग्णवाहिकेसाठी डिझेल किंवा चालक नसल्याचे कारण कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले. या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी तीन नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतरही रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा झाली नसल्याचे या घटनेतून दिसून आले. आमदार वाघ यांनी हा प्रकार पाहताच तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी तात्काळ डफरीनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांना बोलावून चांगलेच खडसावले. “चुका तुमच्या आणि भोगायच्या आम्ही? तुम्ही सरकारला बदनाम का करता?” असे प्रश्न विचारत त्यांनी डॉ. पवार यांच्याकडून जाब विचारला. आमदार वाघ यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होताच, रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची धडपड सुरू केली. काही मिनिटांतच दोन्ही महिलांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली. बाळंतपण पूर्ण होऊन सुटी मिळालेल्या रीना उईके यांना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर येथे जायचे होते. तर दुसरी रुग्ण महिला रोशनी हरिश शिंगणे यांना पुढील उपचारांसाठी नागपूर किंवा डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय रुग्णालयात (पीडीएमएमसी) रेफर करण्यात आले होते. नियमानुसार या दोघींनाही रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र वाहन उपलब्ध नसल्याने त्यांना सुमारे पाऊण तास ताटकळत बसावे लागले. नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसाठी विचारणा केली असता, उईके यांना डिझेल नसल्याचे तर शिंगणे यांना चालक नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णवाहिकेने जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. आमदार वाघ यांनी दखल घेतल्यानंतर डॉ. पवार यांनी तात्काळ वाहने उपलब्ध करून दिली. मात्र, ही दोन्ही वाहने वेगवेगळी होती. शिंगणे यांना रुग्णालयातीलच एका अधिकाऱ्याच्या खाजगी वाहनातून पाठवण्यात आले, तर उईके यांना उपलब्ध करून दिलेल्या वाहनावर ते डफरीनच्या सेवेतील रुग्णवाहिका असल्याचे नमूद नव्हते. यावेळी आमदार वाघ यांच्यासोबत खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, महापौर श्रीचंद तेजवानी, मनपाचे सभागृह नेते चेतन गावंडे, भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *