बारामती पोटनिवडणूक:अजितदादांना श्रद्धांजली म्हणून शरद पवार गट निवडणूक लढवणार नाही; राहुरीबाबत मविआच्या चर्चेनंतर निर्णय- शशिकांत शिंदे
![]()
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असतानाच, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढवणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही बारामतीची पोटनिवडणूक लढवणार नाही, अशी अधिकृत घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यात आज झालेल्या बैठकीनंतर ही भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, अजितदादांचे निधन झाले तेव्हाच ही निवडणूक न लढवण्याचा विचार पक्षाने केला होता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली होती, त्याला प्रतिसाद देत शरद पवार गटाने हा भावनात्मक निर्णय घेतला आहे. दरम्यान, काँग्रेसने या मतदारसंघात उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली असून, त्याबाबत आमची त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. राहुरीबाबत चर्चा करत निर्णय बारामतीप्रमाणेच राहुरी पोटनिवडणुकीबाबतही आजच्या बैठकीत खल झाला. राहुरी संदर्भात प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा झाली असून, आज शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुरीच्या जागेबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा सुरू असून लवकरच त्याबाबतची भूमिका जाहीर केली जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. आमच्या कार्यकर्त्यांना 10 कोटींची ऑफर शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. साताऱ्यात भाजपकडून सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर टीका करताना ते म्हणाले की, आमच्या लोकांना फोडण्यासाठी 10 कोटी रुपये आणि सभापतीपदाचे आमिष दाखवले जात आहे. कर्णे आणि त्यांच्या पत्नीला अशा प्रकारची ऑफर देण्यात आली. तसेच, खरात प्रकरणातील सीडीआर (CDR) कोणी आणि का काढले, याचा खुलासा होण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, जय पवार यांनी काल केलेल्या विधानावर भाष्य करण्यास शशिकांत शिंदे यांनी नकार दिला. बारामतीतून शरद पवार गटाने माघार घेतल्यामुळे आता ही निवडणूक खरोखरच बिनविरोध होणार की काँग्रेस आपला उमेदवार मैदानात उतरवून रंगत वाढवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
