जि.प.च्या ‘वाल ऑफ फेम’वर चहाकार, बेंडे, पुनसे यांची वर्णी:कर्मचाऱ्यांमध्ये उत्कृष्ट काम करण्यासाठीची स्पर्धा, आपल्या कर्तव्यात उमटवला वेगळा ठसा
![]()
येथील जिल्हा परिषदेच्या ‘वॉल ऑफ फेम’वर मार्च महिन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी तीन नव्या कर्मचाऱ्यांची छायाचित्रे झळकली आहेत. यामध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक शरद चहाकार, मुख्यालयातील बीम्स प्रणाली सांभाळणारे स्वप्नील बेंडे आणि बांधकाम विभागाच्या दर्यापुर येथील कार्यालयात कार्यरत उपअभियंता मंगेश पुनसे यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयातील कार्यालय प्रमुखांच्या उपस्थितीत सीईओ संजीता महापात्र यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. सर्वोत्कृष्ट कामकाजासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये निकोप स्पर्धा व्हावी, यासाठी सीईओ महापात्र यांच्या संकल्पनेतून जि.प. प्रशासनाने जानेवारी २०२६ पासून हा उपक्रम सुरु केला आहे. त्यामुळे डिसेंबर २०२५ मध्ये उत्कृष्ट कामकाज करणारे तीन कर्मचारी ‘वॉल ऑफ फेम’चे पहिले मानकरी ठरले होते. तेव्हापासून दरमहा ही वॉल ऑफ फेम पुढे-पुढे सरकत आहे. सदर ‘वॉल ऑफ फेम’ ही सीईओंच्या दालनाबाहेर दर्शनी भागात उभी करण्यात आली असून ती जिल्हा परिषदेत ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सहजच दृष्टीस पडते. त्यामुळे गेल्या महिन्यात कुणी उत्कृष्ट काम केले, त्याचा विभाग कोणता आणि जबाबदारी कोणती, याची माहितीसुद्धा जनमानसांपर्यंत पोहोचते. गेल्या महिन्यात सर्वच विभागांमध्ये मार्च एन्डींगची घाई होती. त्यामुळे प्रत्येकच विभाग आपापल्या कामात गर्क होता. तरीदेखील आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून चहाकार, पुनसे आणि बेंडे यांनी आपल्या कर्तव्यात वेगळा ठसा उमटवला. वाल ऑफ फेमसाठी जिल्ह्यातील सर्वच खातेप्रमुखांकडून त्यांच्या कामकाजाची माहिती मागविण्यात आली होती. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा करुन सदर तिघांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर तिघांनाही मुख्यालयी पाचारण करुन सीईओ संजीता महापात्र यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. मंगेश पुनसे हे काही अपरिहार्य कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहु न शकल्याने त्यांच्यावतीने कनिष्ठ अभियंता जगदीश पानसे यांनी सन्मान स्वीकारला. यावेळी अतिरिक्त सीईओ विनय ठमके, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड आणि इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शरद महादेवराव चहाकार हे शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी खाजगी शाळा आस्थापनांचे अभिलेखे संगणकीकृत केले. वाल ऑफ फेमचे दुसरे मानकरी स्वप्नील बेंडे यांनी बीम्स प्रणालीवर उद्दिष्टानुसार शंभर टक्के ध्येयप्राप्ती केली, तर मंगेश पुनसे हे दर्यापुर येथील बांधकाम विभागात उप अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात रस्ते आणि बांधकामसंबंधी समस्यांचे निवारण करण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली.
