बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला:ॲड. आकाश मोरेंना उमेदवारी जाहीर, मल्लिकार्जुन खर्गेंकडून शिक्कामोर्तब
![]()
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले असून, काँग्रेसने या मतदारसंघात आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आकाश विश्वनाथ मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, आता बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे असा थेट सामना रंगणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मोठी मोर्चेबांधणी केली होती. खुद्द सुनेत्रा पवार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून पाठिंब्याचे आवाहन केले होते. मात्र, ‘लोकशाहीत निवडणुका लढवणे गरजेचे आहे’ अशी भूमिका घेत काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय कायम ठेवला. रविवारी उशिरा दिल्लीतून आकाश मोरे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. कोण आहेत आकाश मोरे? सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे सोमवारी सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः बारामतीत उपस्थित राहणार असून शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांच्यासमोर आता काँग्रेसचे अधिकृत आव्हान उभे राहिल्याने, बारामतीची ही पोटनिवडणूक राज्यभरासाठी प्रतिष्ठेची आणि कुतूहलाची ठरणार आहे. अजित पवारांनंतर बारामतीचा गड कोण राखणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
