पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च २०२६ रोजी शिवलावाडी परिसरातून मोटारसायकल चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वजीराबाद तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यांतील एकूण १७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनात,वजिराबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजू वटाणे,पोलीस अंमलदार चाऊस,पोकळे,ज्वालासिंग बावरी,कदम,रमेश सूर्यवंशी आणि पावडे आणि कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.
या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.सोबतच अल्पवयीन बालके अश्या प्रकरणांमध्ये गुंतलेली आहेत. यावर समाजाने स्वःत आत्म परीक्षण करण्याची गरज आहे.आपली बालके कोठे जातात,काय करतात,कोणासोबत वावरतात यावर पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
