या कार्यक्रमाला व्यासपीठावर खा. दिग्विजय सिंग, खा. कपिल सिब्बल, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि स्वतः खा.संजय राऊत उपस्थित होते. या प्रसंगी संजय शर्मा यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, सरकार सोशल मीडियावर विविध प्रकारची बंधने आणत आहे. त्यांनी स्वतःच्या अनुभवाचा उल्लेख करत सांगितले की, त्यांच्या 4 PM या चॅनेलला सरकारने बंद केले असून त्यासाठी ते न्यायालयीन लढा देत आहेत.
शर्मा पुढे म्हणाले की, जे पत्रकार सरकारच्या बाजूने बातम्या छापतात त्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. त्यांनीही एकदा अशीच सुविधा मागितली होती, ज्यामुळे त्यांना उत्तर प्रदेशमध्ये घर मिळाले. मात्र, जेव्हा त्यांनी सरकारविरोधात बोलायला आणि चर्चा करायला सुरुवात केली, तेव्हा शंभर पोलिसांच्या उपस्थितीत त्यांचे घर काढून घेण्यात आले. हा अनुभव सांगताना त्यांनी माध्यमांच्या स्वातंत्र्यावर होत असलेल्या मर्यादांबद्दल चिंता व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, लोकशाहीचा गळा घोटला जात असताना काही जण मात्र ठामपणे उभे राहिले. खा. संजय राऊत हे आजारी असतानाही लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहिले, याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. लोकशाहीच्या इतिहासात त्यांच्या नरकात स्वर्ग या पुस्तकाची नोंद निश्चितच घेतली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
ईडीसारख्या यंत्रणांचा दबाव असतानाही काही लोकांनी हार मानली नाही, असे सांगत त्यांनी राऊत यांच्या संघर्षाचे कौतुक केले. समाजाला जागवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शर्मा यांनी 2017 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सरकार बदलल्यानंतर जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणावर निधी कसा राखून ठेवण्यात आला यावरही भाष्य केले. त्यांच्या मते, जनतेच्या पैशातून पत्रकारांना जाहिरातींच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो, आणि त्यामुळे काही पत्रकार सत्तेची बाजू घेतात. त्यांना स्वतःलाही दरवर्षी दहा कोटी रुपयांचे बजेट देण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यांनी ती नाकारली.
ते म्हणाले की, 2014 पूर्वी त्यांनी काँग्रेसविरोधातही अशाच प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामुळे पत्रकार कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने नसतो, तर त्याचे काम सत्य जनतेसमोर आणणे हेच असते. मात्र, त्यांनी सरकारविरोधात बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली. त्यांच्या केवळ एका कार्यालयाची नव्हे, तर 18 जिल्ह्यांतील सर्व कार्यालयांची चौकशी करण्यात आली.
याशिवाय, त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या वर्तमानपत्रा वरून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागले. त्यांनी जामीन घेतला, पण आपले ध्येय सोडले नाही. 4 PM चॅनेल बंद झाल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच नावाने दुसरे चॅनेल सुरू केले, ज्याला जनतेने मोठा प्रतिसाद दिला.
निवडणुकीसंदर्भातील बातम्या प्रकाशित केल्यानंतर त्यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली. त्यानंतर त्यांनी यूट्यूबवर 4PM गुजरात सुरू केले, ज्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. एका दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आतंकवादी कुठून येतात, सुरक्षा यंत्रणा काय करत होत्या यामुळे त्यांचे चॅनेल पुन्हा बंद करण्यात आले.
यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्या वेळी खा. कपिल सिब्बल यांनी त्यांना मदत केली. त्यांनी सांगितले की, फी मोठी असली तरी ते त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या लढ्याला पाठिंबा देतात. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा ठरला.
पुढे त्यांनी दुबईमध्ये 4PM मिडल ईस्ट हे यूट्यूब चॅनेल सुरू केले, जे आज 140 देशांमध्ये पाहिले जाते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही उल्लेख करत सांगितले की, जर त्यांच्या विरोधात इतकी बंधने आणली नसती, तर कदाचित त्यांना इतका मोठा जनसमर्थन मिळाले नसते.
शेवटी त्यांनी असे नमूद केले की, जेव्हा लोकशाहीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अरविंद केजरीवाल, संजय राऊत आणि कपिल सिब्बल यांसारख्या नेत्यांची नोंद केली जाईल, कारण त्यांनी कठीण काळात लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष केला. देशाचा आवाज दाबला जात असताना काही लोक ठामपणे उभे राहिले आणि सरकारविरोधात बोलत राहिले, हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी संजय शर्मा यांनी नरकात स्वर्ग सारखे पुस्तक लिहिल्याबद्दल संजय राऊत यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
