मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावले
लोहा तालुक्यातील वडेपुरी परिसरात १३ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता पती-पत्नी मोटारसायकलवरून जात असताना अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग केला. संधी साधून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या मंगळसूत्राची किंमत सुमारे २५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
नांदेड ग्रामीणमध्ये ३० हजारांची सोन्याची पोत हिसकावली
नांदेड ग्रामीण परिसरातील मेडिप्लस मेडिकल सिडको येथे १३ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे १.५० वाजता घराकडे जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात इसमांनी संगनमत करून हिसकावून नेली. या सोन्याच्या पोतीची किंमत अंदाजे ३० हजार रुपये आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
हिमायतनगरमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास
हिमायतनगर येथील खडकी बाजार परिसरात १३ ऑगस्ट ते १४ ऑगस्टदरम्यान रात्रीच्या सुमारास घरफोडीची घटना घडली. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व महत्त्वाचे कागदपत्रे, असा एकूण अंदाजे १ लाख ५२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
हदगावमध्ये वाहनातून ९८ हजारांची रोकड चोरीला
हदगाव-नांदेड रोडवरील हदगाव परिसरात १४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११.५० वाजता वाहनात ठेवलेली ९८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. वाहनात ठेवलेली रोकड गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.
मालेगावमध्ये सायबर फसवणुकीचा प्रकार
मालेगाव, ता. अर्धापूर येथे नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत सायबर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. तक्रारीनुसार, एका संशयिताने आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने सामान्य नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्या नावाने म्युल अकाउंट उघडल्याचे समोर आले. या प्रकरणाची माहिती NCCRP पोर्टलवर प्राप्त झाल्यानंतर संबंधित आरोपीविरुद्ध सायबर पोलिस ठाणे, नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकाचवेळी घडलेल्या चोरी, हिसकावणी, घरफोडी आणि सायबर फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. रस्त्यावरून प्रवास करताना दागिने व मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्यासोबतच घर बंद ठेवताना आवश्यक सुरक्षा उपाय करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच अनोळखी व्यक्तींना बँक खात्याची किंवा ऑनलाइन व्यवहारांची माहिती न देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

