![]()
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अत्यंत दुर्गम, घनदाट जंगल आणि कुमरी पहाडाच्या कुशीत वसलेल्या बिनागुंडा गावात अखेर एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला आहे. स्वातंत्र्याच्या तब्बल 79 वर्षांनंतर पहिल्यांदाच या गावात अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. गेल्या सात दशकांपासून हे गाव लाल सावलीच्या भीषण छायेत होते. नक्षलवाद्यांची कमालीची दहशत, घनदाट जंगल आणि अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे येथे साधी पोलिस यंत्रणा किंवा महसूल विभागाचे कर्मचारी पाऊल ठेवण्यासही धजावत नव्हते. शासकीय यंत्रणा आणि प्रशासन पोहोचूच न शकल्यामुळे हे गाव काळाच्या ओघात मुख्य प्रवाहापासून पूर्णपणे तुटलेले राहिले. रस्ते, वीज, आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहून येथील स्थानिक माडिया गोंड जमातीतील नागरिकांना नक्षलवाद्यांच्या भीतीच्या सावलीतच जीवन कंठावे लागत होते. मात्र, गडचिरोली पोलिस दल आणि सीमा सशस्त्र बलाने दाखवलेल्या धैर्यामुळे हे चित्र बदलले आहे. 24 जानेवारी 2026 रोजी सुरक्षा दलांनी या आव्हानात्मक भागात जाऊन ‘विशेष पोलिस मदत केंद्र’ यशस्वीपणे स्थापन केले. सुरक्षेचे भक्कम कवच मिळताच नक्षलवाद्यांची दहशत संपुष्टात आली आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ ग्रामस्थांना समजला. गावात सुरू झालेले विकासाचे वारे रस्ते व दळणवळण: पूर्वी केवळ पाऊलवाटांवरून प्रवास करावा लागत असे. आता सुरक्षा दलांच्या मदतीने “मुरूमकाठाई ते बिनागुंडा’ पक्क्या रस्त्याचे आणि पुलांचे काम वेगाने सुरू आहे. अनेक दशकांची नक्षली दहशत संपवून बिनागुंडा गाव आता आत्मसन्मानाने आणि आत्मविश्वासाने विकासाच्या मुख्य प्रवाहात पाऊल टाकत आहे. 4-G नेटवर्क व वीज: गावात सौर ऊर्जेच्या साहाय्याने वीज पोहोचवण्यात आली असून मोबाईल टॉवर उभारल्यामुळे हे गाव पहिल्यांदाच जगाशी डिजिटल स्वरूपात जोडले गेले आहे. शुद्ध पाणी व आरोग्य: नैसर्गिक झऱ्यांचे पाणी पिणाऱ्या ग्रामस्थांसाठी बोअरवेल्स आणि सौर नळ योजना सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांच्या “दादलोरा खिडकी’ उपक्रमाद्वारे गावात वैद्यकीय शिबिरे भरवून मोफत औषधोपचार पुरवले जात आहेत.
स्वातंत्र्यानंतर 79 वर्षांनी बिनागुंडात प्रथमच फडकला राष्ट्रध्वज:नक्षली दहशतीनंतर ग्रामस्थांनी अनुभवला 'स्वातंत्र्याचा सूर्योदय'

