![]()
ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर १ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला ओबीसी नेते लक्ष्मण हाके, अॅड. मंगेश ससाणे, नवनाथ वाघमारे तसेच राज्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सरकार, ओबीसी मंत्र्यांची भूमिका आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर जोरदार टीका करण्यात आली. भाजपला ओबीसी समाजाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल दुःख व्यक्त करत हाके यांनी राज्यातील नऊ ओबीसी मंत्र्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. सरकारने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा देत त्यांनी ओबीसी समाजाला या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. ओबीसी आंदोलनाकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे आंदोलन लक्षवेधी करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. हे आंदोलन ओबीसींचे शेवटचे अन् निर्णायक ठरणार लक्ष्मण हाके म्हणाले, “२ वर्षांपासून महाराष्ट्रात झुंडशाहीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री व ओबीसी नेत्यांबद्दल अपमानास्पद भाषा वापरली जात आहे. आम्हाला पोलिस संरक्षण घेऊन फिरावे लागते; आम्ही दहशतवादी आहोत का?” १ सप्टेंबरचे आंदोलन हे ओबीसी समाजाचे शेवटचे आंदोलन असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
1 सप्टेंबरला मुंबईमध्ये ओबीसींचे राज्यव्यापी आंदोलन: लक्ष्मण हाके:पुण्यातील बैठकीनंतर इशारा, मनोज जरांगेंच्या आंदोलनावरही टीका

