उदगीरमध्ये मटका अड्ड्यांवर पोलिसांची धाड; 66 हजारांची रोकड, मोबाईलसह मुद्देमाल जप्त


उदगीर (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर व ग्रामीण भागात मटका अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व अन्य साहित्य असा सुमारे 1 लाख 28 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 12 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 मार्च रोजी हवाईस्वामी मठासमोर एका घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत 51 हजार 790 रुपयांची रोख रक्कम व 20 हजार रुपये किमतीचे 3 मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणात 9 आरोपींना ताब्यात घेऊन महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा क्रमांक 62/2026 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार सरफराज गोलंदाज करत आहेत.

तसेच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एस.टी. कॉलनी परिसरातील पानटपरीवर सुरू असलेल्या मटका व्यवसायावरही छापा टाकण्यात आला. या कारवाईत 21 हजार 330 रुपयांची रोख रक्कम, 20 हजार रुपये किमतीचे 2 मोबाईल आणि 15 हजार रुपयांचे जी-विन लॉटरी साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात 3 आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा क्रमांक 114/2026 दाखल करण्यात आला असून तपास पोलीस अंमलदार मुबारक उल्ला करत आहेत.

दोन्ही कारवायांमध्ये एकूण 73 हजार 120 रुपयांची रोख रक्कम, 5 मोबाईल आणि अन्य साहित्य असा एकूण 1 लाख 28 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप खानसाळे, संजीव जिंकाळवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. या धाडसी कारवाईबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर तसेच 91 50 100 100 या हेल्पलाईनवर कळवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *