'उजास'चे उत्पादन नेटवर्क महाराष्ट्रात विस्तारले:महिलांसाठी उपजीविकेच्या संधी वाढवण्यासाठी वर्ध्यात नवे युनिट




आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘उजास’ संस्थेने महाराष्ट्रातील महिलांसाठी उपजीविकेच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने आपल्या उत्पादन नेटवर्कचा विस्तार केला आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टअंतर्गत अद्वैतेशा बिर्ला यांनी स्थापन केलेल्या ‘उजास’ संस्थेने महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या सहकार्याने वर्धा येथे नवीन ‘उजास ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट’ सुरू केले आहे. या नव्या युनिटमुळे महिलांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या उत्पादन व्यवस्थेला बळ मिळणार असून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार आणि उद्यमशीलतेच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या महाराष्ट्रात ‘उजास’ची दोन ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स कार्यरत असून त्यामार्फत ४५ स्वयंसेवा गटांतील महिलांना रोजगार मिळत आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाडा भागातील सुमारे १,५०० महिलांसाठी अतिरिक्त उपजीविकेच्या संधी निर्माण होत आहेत. जालना येथे सुरू असलेल्या युनिटने गेल्या दोन वर्षांत १ लाख ११ हजार १२५ पुनर्वापरयोग्य कापडी पॅडचे उत्पादन करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर वर्धा येथील नवीन युनिटकडून दरवर्षी सुमारे ५५ हजारांहून अधिक कापडी पॅडचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. ‘उजास’च्या प्रमुख पूनम पाटकर यांनी सांगितले की, या उत्पादन युनिटची रचना पूर्णपणे महिलांच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या उत्पादन परिसंस्थेप्रमाणे करण्यात आली आहे. कटिंग, स्टिचिंग, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग, मार्केटिंग आणि विक्री समन्वयापर्यंत सर्व प्रक्रिया महिलाच सांभाळतात. जालना येथील युनिटच्या अनुभवावरून प्रत्येक सहभागी महिलेला कौशल्य आणि उत्पादनाच्या आधारे दरवर्षी सुमारे ७५ हजार रुपयांचे स्थिर उत्पन्न मिळू शकते. यामुळे महिलांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळण्याबरोबरच बचत गटांनाही शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. उत्पादनासोबतच महिलांना आर्थिक साक्षरता, स्वच्छता मानके आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्या स्वतंत्रपणे युनिटचे संचालन व विस्तार करू शकतात. हा उपक्रम केवळ रोजगार निर्मितीपुरता मर्यादित नसून महिलांमध्ये आत्मविश्वास, कौशल्य आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे संस्थेने स्पष्ट केले. या विस्तारामुळे तळागाळातील महिलांच्या नेतृत्वाखालील उद्यमांना चालना मिळून ग्रामीण भागातील समुदायाधारित विकासाला नवे बळ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *