परभणी (प्रतिनिधी)- गोशाळेसंदर्भातील तक्रारीवर कारवाई करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई ६ मार्च रोजी गंगाखेड–परळी रोडवरील निळा फाटा येथील विश्व लक्ष्मी रसवंती गृह येथे करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपी भगवान विठ्ठल मुंढे (वय ५४) हे सोनपेठ पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार (वय ७०, रा. ओमकार नगर, गंगाखेड) हे गोशाळा चालविण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या मुलीने गोशाळेत घडलेल्या एका घटनेबाबत १८ फेब्रुवारी रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी बीट जमादार भगवान मुंढे यांच्याकडे देण्यात आली होती.
तक्रारीवर कारवाई करण्यासाठी मुंढे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली असता मुंढे यांनी तक्रारदाराकडून लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पुढे तडजोडीअंती ८ हजार रुपये स्वीकारण्यास आरोपीने सहमती दर्शवली.
यानंतर ६ मार्च रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. गंगाखेड–परळी रोडवरील निळा फाटा येथील विश्व लक्ष्मी रसवंती गृह येथे आरोपी भगवान मुंढे यांनी तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल, वॉलेट, पोलीस ओळखपत्र, मतदान ओळखपत्र तसेच ६५० रुपये रोख रक्कम मिळून आली आहे. मोबाईल तपासणीसाठी ठेवण्यात आला असून आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रेफर केल्यामुळे त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मनीषा पवार करीत आहेत.
Post Views: 9
