स्वतःला दत्तधाम सरकार म्हणून घेणारा राजेंद्र गडगे निघाला वीज चोर:दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला; महावितरणचा झटका
![]()
संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात ‘दत्तधाम’ नावाने आश्रम चालवणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मंत्र-तंत्र आणि दैवी शक्तीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपांमध्ये आधीच पोलिस कोठडीत असलेल्या गडगेवर आता महावितरणनेही मोठी कारवाई केली आहे. आश्रमात छापा टाकताना वीज चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर महावितरणने त्याच्यावर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. महावितरणच्या पथकाने आश्रमाची तपासणी केली असता, मुख्य वीज मीटरला बायपास करून थेट वीज वापर केली जात असल्याचे स्पष्ट झाले. आश्रमात एसी, पाण्यासाठी बोअरवेल आणि इतर सुविधा चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज वापरली जात होती. मात्र, त्याचे बिल भरण्याऐवजी बेकायदेशीर मार्गाने वीज चोरी केली जात असल्याचे आढळले. या प्रकारामुळे महावितरणने तत्काळ दंडात्मक कारवाई सुरू केली. राजेंद्र गडगे स्वतःला दत्तधाम सरकार म्हणून ओळख करून देत असे. युट्यूब आणि इतर माध्यमांतून तो गंभीर आजार बरे करण्याचे, तसेच अपत्यप्राप्ती करून देण्याचे खोटे दावे करत होता. या बहाण्याने तो भक्तांकडून 15 हजार ते 51 हजार रुपयांपर्यंत रक्कम घेत असल्याची माहिती समोर आली आहे. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर पोलिसांनी गडगेसह त्याच्या मुलीवर आणि इतर सहकाऱ्यांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असून, महावितरणच्या कारवाईमुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. वीज चोरी प्रकरणातही पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी गडगेच्या आश्रमाची सुमारे चार तास सखोल झाडाझडती घेतली. वडगावपान येथील दत्तधाम दरबारात पंचनामा करण्यात आला. या वेळी गडगे याला घटनास्थळी नेण्यात आले असता त्याने अंनिसवरच आरोप करत आपल्याविरोधात कट रचल्याचा दावा केला. मी लोकांची सेवा करतो, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, असे तो पोलिसांसमोर ठामपणे सांगत होता. चमत्कारांचे आश्वासन देणारा भोंदू स्वतःच वीज चोर पोलिसांनी त्याला बोलण्यास थांबवले तरीही त्याने आपले म्हणणे मांडतच राहिले. उलट पोलिस माझा छळ करत आहेत, असेही आरोप त्याने केले. मात्र, एकीकडे लोकांना चमत्कारांचे आश्वासन देणारा हा भोंदू स्वतःच वीज चोरी करत असल्याचे समोर आल्याने त्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, आणखी कोणते खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
