पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी, दरडी कोसळल्याने जनजीवन विस्कळीत:'पीएमआरडीए'ने युद्धपातळीवर शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले




पुणे महानगर प्रदेशात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पूर व दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. या गंभीर आपत्कालीन परिस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दल आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दलाने (पीडीआरएफ) तातडीने मदत व बचावकार्य राबवले. जवानांनी शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांचे प्राण वाचवले. मुसळधार पावसामुळे मावळ आणि लोणावळा परिसरात मोठ्या दरडी कोसळल्या. पाटण (लोणावळा) येथील पाटण-बोरज रस्त्यावर दरड कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेसह तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मळवली येथे दरड कोसळल्याने २५ ते ३० नागरिक अडकले होते. तसेच पवना लेकजवळील आपटी गावातही दरड कोसळून २५ ते ३० नागरिक अडकले होते, जिथे मारुंजी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. नद्यांना आलेल्या पुरामुळे आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक नागरिक अडकले होते. पीडीआरएफच्या जवानांनी लाईफ रिंग, लाईफ जॅकेट आणि दोरीच्या साहाय्याने त्यांना सुरक्षित बाहेर काढले. आळंदी येथील केंद्रे महाराज मठात पुराचे पाणी शिरल्याने २० पोलीस अंमलदारांसह २४ जणांची पथकाने सुटका केली. लोणावळ्यातील माऊंट व्ह्यू सोसायटी व अबेडा व्हिला परिसरात बंगल्यात अडकलेल्या ८ पुरुष आणि ७ लहान मुलांसह १५ नागरिकांना वाचवण्यात आले. चाकण-चिंबळी फाटा येथील एका नामांकित कंपनीत अडकलेल्या २० ते २५ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. लोणावळ्यातील वेदांत अकॅडमीच्या परिसरातून २५ नागरिकांना जवानांनी सुटका केली. जांभे गावात खबरदारीचा उपाय म्हणून ३० ते ३५ नागरिकांना प्राथमिक शाळेत तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. इतर आपत्कालीन कॉलवर तातडीने प्रतिसाद देत, धायरी येथील लक्ष्मी पार्क सोसायटीतील बेडरूममध्ये अडकलेल्या ४ व ११ वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींची अग्निशमन जवानांनी सुखरूप सुटका केली. नांदेड सिटीमध्ये गॅस गळती रोखून मोठी दुर्घटना टाळण्यात आली, तर धानोरे गावात रस्त्यावर पडलेले मोठे झाड क्रेनच्या साह्याने हटवून वाहतूक सुरळीत केली. लोणावळा परिसरात संभाव्य परिस्थिती लक्षात घेता पीएमआरडीएची तीन पथके अद्यापही मुक्कामी तैनात आहेत. नियंत्रण कक्ष २४ तास सतर्क आहे. “नागरिकांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी (९५४५२८२९३०) त्वरित संपर्क साधावा,” असे आवाहन पीएमआरडीएचे अग्निशमन दल व पीडीआरएफ प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *