पुण्यात 'गँगस्टर' जेरबंद, 62 लाखांचे दागिने जप्त:आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील गुन्हेगाराचा पर्दाफाश




पुण्यात घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या आणि उत्तर प्रदेशात गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या आंतरराज्यीय ‘सनी’ गँगच्या दोन सदस्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी परराज्यात घरफोडी करण्यासाठी विमान किंवा रेल्वेने प्रवास करत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आकाश सुभाष (वय २३, मूळ रा. मेरठ, उत्तर प्रदेश, सध्या रा. सुंदरनगरी, दिल्ली) आणि जितेंद्र चतुर्वेदी (वय ३२, रा. सुंदरनगरी, दिल्ली) अशी आहेत. जानेवारी महिन्यात विश्रामबाग पोलिस ठाण्यात एका घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी घरात नसताना अज्ञात आरोपींनी दरवाजा तोडून चोरी केली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नेमले. तपास पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. पोलिस अंमलदार आशिष खरात आणि अनिस शेख यांनी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले असता, संशयित आरोपी पुण्यातील विविध भागांत घरफोड्या करत असल्याचे समोर आले. आरोपी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एका लॉजमध्ये थांबले होते आणि त्यानंतर परराज्यात निघून गेल्याचेही तपासात उघड झाले. पोलिसांनी आरोपींच्या हालचालींवर गुप्तपणे लक्ष ठेवले होते. सुमारे महिनाभराच्या तपासानंतर, सीसीटीव्हीमध्ये दिसलेले आरोपी पुन्हा घरफोडीच्या उद्देशाने विश्रामबाग परिसरात ओंकारेश्वर मंदिराजवळ थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे तपास पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेले दागिने पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ लॉजवर छापा टाकून ३२ तोळे सोने आणि १२५ ग्रॅम चांदी हस्तगत केली. तपासात आरोपी आकाश सुभाष हा उत्तर प्रदेशातील ‘सनी गँग’शी संबंधित असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि गँगस्टर ॲक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ६ मार्च २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासात आरोपींनी पुणे शहरातील विश्रामबाग, समर्थ, खडक आणि भोसरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणात एकूण सुमारे ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलिस आयुक्त चंद्रकांत भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर तसेच पोलिस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जन थोरात, नितीन बाबर आणि अर्जुन कुडाळकर यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *