सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला:वरळीतील गोंधळावरून विजय वडेट्टीवारांचा बोचरा वार, रोहित पवारांचीही टीका
![]()
वरळी येथे महायुतीच्या ‘आक्रोश मोर्चा’मुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना खरीखोटी सुनावली. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे. “भाजपच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा ‘इथून चालते व्हा’ हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला,” अशा बोचऱ्या शब्दांत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपच्या इव्हेंटबाजीला मुंबईकर महिलेने वास्तवाचा आरसा दाखवला असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर न झाल्याने महायुतीच्या वतीने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांविरोधात आज (२१ एप्रिल) वरळीत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, या मोर्चामुळे दुपारच्या सुमारास वरळी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दुपारी १ च्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक हैराण झाले होते. याच कोंडीत अडकलेल्या एका महिलेचा संताप अनावर झाला आणि तिने गिरीश महाजन यांना झापले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आता यावरून विरोधकांना भाजपवर टीका करण्याची संधी मिळाली आहे. नेमके काय म्हणाले विजय वडेट्टीवार? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडिओ शेअर करत भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, “भाजपच्या महिला आघाडीला वाटलं असेल की घोषणाबाजीने आसमंत दणाणून सोडला की महिलांचे प्रश्न सुटले! पण भाजपच्या कार्यकर्त्यांना काय माहित, की खरी नारी शक्ती काय असते! त्यांच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा इथून चालते व्हा हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला. इव्हेंटच्या कॅमेऱ्यात शक्ती प्रदर्शन शूट होत असताना अचानक सामान्य मुंबईकर महिलेने भाजपला आरसा दाखवला.” विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “एकीकडे आरक्षणाचे कागदी घोडे नाचवायचे आणि इव्हेंट करणाऱ्याच्या नादात रस्ते अडवायचे, ही कसली पद्धत? कदाचित भाजपला वाटलं असेल की ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर जनतेला आरक्षणाचे महत्त्व जास्त चांगल्या प्रकारे समजेल. पण मुंबईकर महिला आहे ती, तिला भाजपच्या इव्हेंट बाजी दिसली आणि तिथेच तिने सुनावले! भाजपचे आंदोलन फक्त दिखावा महिला आरक्षणाच्या नावाखाली धुंदीत असलेल्या नेत्यांना वास्तवाचा चटका दिला तो एका महिलेने. महिलांच्या प्रगतीचा रस्ता विरोधकांनी अडवला म्हणून बोंबाबोंब करणाऱ्यांना जनतेचे रस्ते अडवून धरल्यावर, सामान्य महिलेने त्यांना ‘रस्ता’ दाखवला यातच सगळं आलं! भाजपचे आंदोलन म्हणजे फक्त दिखावा होता. पण महिला आघाडी विरुद्ध एकटी महिला असा सामना झाला तेव्हा निकाल वास्तवाच्या बाजूनेच लागला!
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले? महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणा-या भाजपाचा खरा चेहरा या भगिणीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपाचा डाव ‘इंडिया’ आघाडीने आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता; मात्र या धाडसी भगिनीने तोही डाव उधळून लावला आहे, असेही ते म्हणाले. आज फक्त मंत्री गिरीष महाजन यांना पळवून लावले आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. रोहित पवार काय म्हणाले? या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “अनेक लोकांना आरोग्याच्या अडचणी असतात आणि अशा परिस्थितीत केवळ केंद्रातून आदेश आले म्हणून आणि His Masters Voice ला खूष करण्याच्या प्रयत्नात एखादा पक्ष लोकांना तीन-तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवत असेल तर त्याची जोरदार रिॲक्शन मिळणारंच.. अशाच एका संतप्त महिलेचा मुंबईतील व्हिडिओ बघायला मिळाला. आंदोलनाचं कारण सत्य असेल तर लोकं समजून घेतात… पण खोट्यासाठी लोकांना वेठीस धरलं जात असेल तर लोक तोंडावर कशी फजिती करतात, हेच या व्हिडिओतून दिसतं. आता त्रस्त व्यक्ती रागावल्याने काही वेळा शब्द चुकीचे जाऊ शकतात पण म्हणून संबंधित लाडक्या बहिणीवर कारवाई न करता तिच्या भावना समजून घेऊन तिला त्रास देणाऱ्यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे…!.” असेही रोहित पवार म्हणालेत.
