वाडी, लिंबगाव, नवीन वाडी, तळणी, नाळेश्वर यासह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी नांदेड शहर गाठावे लागू नये, यासाठी १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. आमदार बालाजी कल्याणकर यांनी या रुग्णालयासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर २६ मार्च २०२३ रोजी रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली.
संबंधित कंत्राटदाराला हे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे मार्च २०२५ पर्यंत रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, निर्धारित मुदत संपूनही काम पूर्ण झालेले नाही. उलट आता काम सुरू होऊन तीन वर्षांहून अधिक कालावधी लोटला असूनही रुग्णालय अद्याप नागरिकांच्या सेवेत दाखल झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर आणि कामाच्या देखरेखीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या रुग्णालयाच्या इमारतीसाठी अंदाजे ४१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील बाबा कंस्ट्रक्शन एजन्सीकडून बांधकाम करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या आरोग्य सुविधेचा लाभ ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र, बांधकामातील दिरंगाईमुळे नागरिकांना आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, यंदा नांदेड जिल्ह्यात तुलनेने कमी पाऊस झालेला असतानाही रुग्णालयाच्या नव्या इमारतीत विविध ठिकाणी पावसाचे पाणी झिरपत असल्याचे दिसून येत आहे. इमारत अद्याप पूर्णपणे वापरातही आलेली नसताना गळती सुरू झाल्याने बांधकामाचा दर्जा, छताची जलरोधक व्यवस्था आणि इतर कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. भविष्यात रुग्णालय सुरू झाल्यानंतर गळतीची समस्या कायम राहिल्यास रुग्णसेवेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
रुग्णालयात महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे, औषधसाठा आणि विविध यंत्रणा कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे इमारतीतील गळतीकडे केवळ किरकोळ तांत्रिक त्रुटी म्हणून न पाहता तिची तातडीने तांत्रिक तपासणी करण्याची गरज आहे. गळतीची नेमकी कारणे शोधून बांधकामातील दोष दूर करावेत, तसेच आवश्यक असल्यास संबंधित कंत्राटदाराकडूनच दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तब्बल ४१ कोटी रुपयांचा प्रकल्प असल्याने कामाच्या प्रत्येक टप्प्यावर संबंधित विभागाकडून नियमित पाहणी आणि तांत्रिक देखरेख झाली का, याचीही चर्चा सुरू आहे. निर्धारित कालावधीत काम पूर्ण न झाल्याबद्दल संबंधित कंत्राटदारावर कोणती कार्यवाही करण्यात आली, प्रकल्पाला विलंब का झाला, विलंबामुळे खर्चात वाढ होणार आहे का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाडी परिसरातील नागरिकांसाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना किरकोळ उपचारांपासून गंभीर आजारांपर्यंतच्या सुविधा जवळच्या ठिकाणी मिळाल्यास नांदेड शहरातील मोठ्या रुग्णालयांवरील ताणही कमी होऊ शकतो. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासही या रुग्णालयाची मोठी मदत होणार आहे.
त्यामुळे प्रशासनाने या प्रकल्पाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. त्याचबरोबर इमारतीच्या बांधकामाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून गळतीसह अन्य त्रुटींची पाहणी करावी. कामाची सद्यस्थिती आणि रुग्णालय सुरू करण्याची निश्चित कालमर्यादा प्रशासनाने जाहीर करावी, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही रुग्णालय अद्याप सेवेत दाखल झालेले नाही. त्यामुळे नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी परिस्थिती निर्माण झालेल्या या प्रकल्पाला आता तरी गती मिळणार का आणि वाडी परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, हा प्रश्न कायम आहे.
