अमरावतीत विहिरीत आढळलेला मृतदेह खुनाचा, ८ आरोपींवर गुन्हा:24 तासांत 4 जणांना अटक, तिघे आधीच कारागृहात

0
8d7faa6f-4593-43c3-872c-b75869a6a450_1772640447050.jpg




अमरावती शहर गुन्हे शाखेने छत्री तलाव परिसरात विहिरीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. हा खुनाचा प्रकार असून, याप्रकरणी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २४ तासांच्या आत कारवाई करत पाचपैकी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर तीन आरोपी आधीच एका वेगळ्या गुन्ह्यात कारागृहात आहेत. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये महादेवखोरी येथील आदेश रघुनाथ तेलमोरे (२४), रोहित संजय तायडे (२३), दीप उर्फ यशोदीप विनायकराव वेलकर (२५), जय नागोराव कोकाटे (१९), संजय विलास वानखडे (२३), गौरव दिलीप गजभिये (२५, संजय गांधी नगर), निश्चय सुनील पोटफोडे (२१, जीवनछाया कॉलनी) आणि तुषार अनिल सुपनेर (२५, संजय गांधीनगर) यांचा समावेश आहे. यापैकी आदेश तेलमोरे, रोहित तायडे आणि दीप वेलकर हे ११ फेब्रुवारीच्या नांदगाव पेठ येथील एका गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात आहेत. मृत व्यक्तीची ओळख महादेवखोरी येथील रहिवासी अमर मोतीलाल व्यास अशी झाली आहे. पोलीस चौकशीनुसार, अमर व्यास ९ फेब्रुवारी रोजी सुरतहून अमरावतीत आले होते आणि त्याच दिवसापासून ते बेपत्ता झाले होते. महादेवखोरी परिसरातील काही मुलांनी एका व्यक्तीला मारहाण करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकला असल्याची गुप्त माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार, मृत व्यक्तीचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला होता आणि त्यांच्या मांडी व शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने भोसकल्याच्या खुणा होत्या. यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांत आधी दाखल झालेला मर्ग (अकस्मात मृत्यूची नोंद) खुनाच्या गुन्ह्यात बदलण्यात आला. आठ आरोपींपैकी तिघे सराईत गुन्हेगार असून ते आधीच इतर गुन्ह्यांमध्ये कारागृहात आहेत. उर्वरित पाचपैकी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक आरोपी फरार आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने, अंमलदार सुनील लासुरकर आणि त्यांचे सहकारी फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks