धुलीवंदनाला 709 वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले:अमरावतीत पोलिसांनी केली कठोर दंडात्मक कारवाई




धुलीवंदनाच्या दिवशी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७०९ वाहनचालकांवर अमरावती शहर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. बेधुंदपणे वाहन चालविल्याने अनेकांना ही कारवाई महागात पडली. शहर वाहतूक शाखेच्या राजापेठ, गाडगेनगर आणि फ्रेजरपुरा वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली. होळी आणि धुलीवंदन सणांच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक विभागाने आधीच वाहतूक नियमावली जाहीर केली होती आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. तरीही, ७०९ वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन केले. या सर्व वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रत्येक पथकाने आपापल्या कार्यक्षेत्रात नाकाबंदी आणि विशेष मोहीम आयोजित करून अपघातांना कारणीभूत ठरू शकणाऱ्या वाहनचालकांना लक्ष्य केले. या कारवाईदरम्यान विविध प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये १८ वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवताना आढळले, तर ३७३ जण ट्रिपल सीट प्रवास करत होते. दोन वाहनचालकांनी सायलेंसरमध्ये बदल केले होते, तर ३१ जण वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करत होते. वाहतूक चिन्हांचा अवमान करणाऱ्या २६२ जणांवर आणि विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या २३ जणांवर कारवाई करण्यात आली. होळी आणि धुलीवंदन सणादरम्यान शहरात कोणताही अनुचित अपघात होऊ नये, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये, ट्रिपल सीट चालवणाऱ्यांवर कलम १२८ (१)/१९४ (सी) अन्वये, मॉडिफाय सायलेंसर वापरणाऱ्यांवर कलम १९८ अन्वये, मोबाईल वापरणाऱ्यांवर कलम १८४ (सी) अन्वये आणि वाहतूक चिन्हांचा अवमान करून विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कलम ११९/१७७ अन्वये कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) संजय खताळे यांच्या सूचनेनुसार राजापेठ वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण वांगे, गाडगेनगर वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक रिता उईके आणि फ्रेजरपुरा वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक श्रीमती ज्योती विल्लेकर यांनी ही कारवाई यशस्वी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *