उमरीत गोठ्याला आग; दीड लाखाचे साहित्य खाक:सीसीटीव्ही फुटेजमुळे संशयित आरोपी कैद, गुन्हा दाखल

0
29555082-b208-49c3-9943-31d68f4adbf3_1776789818773.jpg




दर्यापूर तालुक्यातील उमरी (ममदाबाद) येथे सोमवारी मध्यरात्री एका गोठ्याला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत सुमारे दीड लाख रुपयांचे शेती साहित्य जळून खाक झाले. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी रोहन विश्वास वडतकर (वय २९) आणि त्यांचे चुलत भाऊ विकास सुरेश वडतकर यांनी रहिमापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या गोठ्यात शेतीसाठी लागणारे स्प्रिंकलर पाईप, पीव्हीसी पाईप, कुटार आणि जनावरांचा चारा साठवला होता. मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास शेजाऱ्यांच्या आरडाओरडीने दोघे जागे झाले आणि बाहेर येऊन पाहिले असता गोठ्याला आग लागलेली दिसली. गावकऱ्यांच्या मदतीने जनावरे सुरक्षित बाहेर काढण्यात आली आणि बोअरवेल तसेच मंदिरातील पाण्याच्या टाकीच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, गावातीलच एका व्यक्तीने आग लावल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असल्याचा दावा फिर्यादींनी केला आहे. आगीमध्ये स्प्रिंकलर पाईप, ताडपत्री, कुटार, खताची पोती आणि इतर शेती अवजारे जळून खाक झाली आहेत. या घटनेची नोंद रहिमापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार अनंत वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks