फार्मसी विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू:राऊत कुटुंबाने गमावला एकुलता एक मुलगा




अमरावती येथे धुलीवंदनाच्या दिवशी माळेगाव तलावात बुडून एका फार्मसी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कार्तिक राऊत असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो राऊत कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कार्तिक हा कारंजा लाड तालुक्यातील खेर्डा येथील कमलपुष्प फार्मसी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकत होता. मंगळवारी दुपारचे जेवण आटोपून तो बडनेरा मार्गावरील एका लॉनवर आयोजित कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यानंतर मित्राच्या फोनमुळे तो भानखेड रस्त्यावरील माळेगाव तलावाजवळ पोहोचला. पोहण्याच्या प्रयत्नात हा अनर्थ घडला. कार्तिक हा कुटुंबाचा भविष्यातील मोठा आधार होता. त्याचे वडील प्रदीप राऊत हे गेल्या ३१ डिसेंबर रोजीच सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत. कार्तिकच्या निधनाने कुटुंबाने केवळ वंशाचा दिवाच नव्हे, तर मोठा आधार गमावला आहे, असे हिंगोलीहून आलेले त्याचे बहिणजावाई, सनदी अधिकारी डॉ. अंकुशकुमार धर्माधिकारी यांनी सांगितले. डॉ. धर्माधिकारी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, कार्तिक अत्यंत मेहनती, कुशाग्र बुद्धीचा आणि मनमिळाऊ होता. विद्याभारती महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनीच कार्तिकला फार्मसीचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला होता. काही नातेवाईकांच्या मते, जर कार्तिकने मित्राच्या आग्रहाखातर तलावाजवळ जाण्याचे टाळले असते, तर कदाचित हा धोका टळला असता. मात्र नियतीने काहीतरी वेगळेच ठरवले होते, अशी चर्चा त्यांच्यात होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *