शिरजगावात वीज कर्मचाऱ्याविरोधात संताप:8 दिवसांत बदली न केल्यास आंदोलनाचा इशारा, ग्रामस्थांचे सहायक अभियंतांना निवेदन
![]()
तिवसा तालुक्यातील शिरजगाव येथील महावितरणचे वीजतंत्री (लाईनमन) भूषण गाडगे यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या आठ दिवसांत त्यांची बदली न झाल्यास ‘धडक आंदोलन’ करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, संबंधित लाईनमन अनेक दिवसांपासून मुख्यालयी राहत नाहीत. वीज बिघाड झाल्यास ते फोन उचलत नाहीत किंवा त्यांचे फोन बंद असतात. यामुळे तांत्रिक अडचणी वेळेत दूर होत नाहीत आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गावातील विजेची कामे कंत्राटी कामगारांकडून करून घेतली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून गावात वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू आहे. मंगळवारी सकाळी ७.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत वीज खंडित होती. याबाबत विचारणा केली असता, लाईनमनकडून उद्धट व अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शेतकरी व नागरिकांशी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी मोझरी येथील सहाय्यक अभियंता मनीषा चांभारे यांना निवेदन देत, भूषण गाडगे यांची तात्काळ बदली करून नवीन लाईनमनची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, येत्या आठ दिवसांत मोझरी येथील कार्यालयावर मोठ्या संख्येने ‘धडक आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी शरद देवघरे, शरद वाघ, सुभाष मालपे, सागर वाढोनकर, महादेव अंबुलकर, देवेंद्र तायवाडे, दिनेश जौंजाळकर, संतोष बेहरे, गंगाधर मनोहर, प्रशांत डोंगरे, सुमेध भोगे, प्रकाश मेश्राम, अमरदीप वाघमारे, गंगाधर भालेराव यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. या संदर्भात सहाय्यक अभियंता मनीषा चांभारे यांनी सांगितले की, “शिरजगाव येथील वीज पुरवठ्यातील अनियमितता आणि लाईनमन संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. वरिष्ठांना यासंदर्भात लेखी अहवाल पाठविण्यात आला असून संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “दोषी आढळल्यास योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. नागरिकांना सुरळीत वीज सेवा देणे ही आमची प्राथमिकता असून, तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.”
