![]()
विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, या भागांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिक, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरसह पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसासाठी पोषक वातावरण हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या चांगलाच सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच, ईशान्य राजस्थानपासून ते दक्षिण कर्नाटकापर्यंत ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे राज्यात पावसाला पोषक असे वातावरण तयार झाले आहे. यंदाच्या एल निनोचा कोणताही विपरित परिणाम मान्सूनवर झालेला नाही. शेतकऱ्यांना दिलासा आणि पाणीप्रश्न मिटला: यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती, मात्र जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसानंतर आता ऑगस्ट महिनाही पावसासाठी दिलासादायक ठरत आहे. राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या या पावसामुळे बरीचशी धरणे तुडुंब भरली असून, पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागलाआहे. हा पाऊस खरिपाच्या पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सिंधुदुर्गात जनजीवन विस्कळीत, गावांचा संपर्क तुटला: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तिलारी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तिलारी नदीला आलेल्या पुरामुळे घोटगे परमे, घोटगेवाडी आणि कुडासे यांसह परिसरातील पुलांवर आणि कॉजवेवर पाणी आले आहे. परिणामी, नदीकाठच्या अनेक गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भंडारा आणि नाशिकमध्येही समाधानकारक पाऊस: विदर्भातील भंडारा जिल्ह्याला आज ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रचंड उकाडा वाढला होता. मात्र, पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने सिंचनाची सोय नसलेल्या आणि पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस मोठा आधार ठरला आहे. दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातही पावसाची समाधानकारक रिपरिप सुरू आहे. हेही वाचा.. झारखंडमध्ये वीज कोसळून 4 ठार, 8 जखमी: हिमाचल-उत्तराखंडमध्ये 252 रस्ते बंद; केरळमध्ये 4 दिवसांत 25 जणांचा मृत्यू देशातील अनेक राज्यांमध्ये सतत पडणारा पाऊस आता जीवघेणा ठरत आहे. झारखंडमध्ये मंगळवारी वीज कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले आहेत. सर्वाधिक 9 मृत्यू गिरिडीह, 3 दुमका आणि 2 लातेहार जिल्ह्यात झाले. दुसरीकडे, केरळमध्ये 1 ऑगस्टपासून सततच्या पावसामुळे आतापर्यंत 25 लोकांचा बळी गेला आहे, तर 4 लोक बेपत्ता आहेत. सततचा पाऊस आणि पुरामुळे हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, 18 हजारांहून अधिक जणांना मदत शिबिरांमध्ये ठेवण्यात आले आहे. सर्वाधिक प्रभावित जिल्हे पथानमथिट्टा, कोट्टायम आणि अलाप्पुझा आहेत. सविस्तर वाचा
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:पुणे, रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट; सिंधुदुर्गात पूरस्थिती, तर विदर्भासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट
