कर्जमाफी योजना प्रभावी अंमलबजावणीसाठी भर:शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचे निर्देश‎




छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात बँकेचे चेअरमन विलास संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी कर्जमाफी योजना संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि अंमलबजावणीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी चेअरमन विलास भुमरे यांनी निर्देश दिले की, शेतकऱ्यांनी फार्मर आयडी आणि ई-केवायसी प्रक्रिया वेळेत व अचूक पूर्ण करावी. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक जनजागृती आणि मार्गदर्शन करावे. तसेच पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. या आढावा बैठकीस बँकेचे संचालक अर्जुनराव गाढे, शेषराव जाधव, अनिल बोरसे, संदीप निकम, तांगडे, कार्यकारी संचालक अजय मोटे, सरव्यवस्थापक ए. आर. वडेकर, चेअरमन यांचे स्वीय सहाय्यक नामदेव खराद, विविध विभागप्रमुख तसेच सर्व तालुक्यांतील कर्जवसुली अधिकारी उपस्थित होते. या योजनेची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ न देण्याचा आणि समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला. दरम्यान, आमदार भुमरे यांनी कर्जमाफी योजनेचा आढावा घेत पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अधिक भर देण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *