परदेशात अडकलेल्या पुणेकरांसाठी महापालिकेच्या विशेष उपाययोजना सुरू:‘विशेष मदत कक्ष’ आणि स्वतंत्र ‘डेटा बँक’ कार्यान्वित करण्याचे आदेश




इराण-इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या पुणेकरांच्या मदतीसाठी पुणे महानगरपालिकेने तातडीने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्तांना ‘विशेष मदत कक्ष’ आणि स्वतंत्र ‘डेटा बँक’ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या इराण आणि इस्रायलमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक पुणेकर नागरिक, विद्यार्थी, पर्यटक आणि व्यावसायिक त्या भागात अडकले असण्याची शक्यता आहे. यामुळे पुण्यातील त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे. या गंभीर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने महापालिकेने युद्धपातळीवर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत लवकरच २४x७ कार्यरत असलेला एक स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष स्थापन केला जाईल. या हेल्पलाईनचा क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून अडकलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांकडून सविस्तर माहिती संकलित केली जाईल. संकलित केल्या जाणाऱ्या माहितीत संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, परदेशातील सध्याचा पत्ता किंवा हॉटेलचा पत्ता, पासपोर्ट क्रमांक तसेच स्थानिक संपर्क क्रमांक यांचा समावेश असेल. ही माहिती अचूक आणि वेळेत जमा करणे महत्त्वाचे आहे. या संकलित माहितीच्या आधारे एक अधिकृत ‘डेटा बँक’ तयार केली जाईल. ही माहिती तातडीने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. यामुळे युद्धग्रस्त भागात अडकलेल्या पुणेकरांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी आवश्यक ती समन्वयात्मक कार्यवाही वेगाने करता येईल. प्रशासनाने तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *