![]()
उत्तर प्रदेशात गेल्या अनेक दशकांपासून प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांच्या आधारे राजकीय अस्तित्व टिकवून असलेली काँग्रेस आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाली आहे. 2027 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 403 जागांवर स्वबळावर लढण्याचा आक्रमक प्लॅन काँग्रेस
.
मुंबईत उत्तर भारतीय सेलच्या कार्यक्रमासाठी आलेले यूपी प्रभारी अविनाश पांडे आणि प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. पांडे म्हणाले की, जानेवारीपासून यूपीत पुढच्या दोन महिन्यांत 17 पेक्षा जास्त भव्य सभा घेतल्या जातील. मोदी-योगींच्या जोडीचा मिथक लोकसभेतच मोडला आहे, आता विधानसभेत भाजपला धूळ चारण्याची वेळ आली आहे.
तगडी मोर्चेबांधणी आणि बुथ मॅनेजमेंट
काँग्रेसने केवळ घोषणाच केल्या नाहीत, तर जमिनीवरही काम सुरू केले आहे. आतापर्यंत 1.69 लाख बीएलए (बूथ लेव्हल एजंट) नियुक्त करण्यात आले असून, ते मतदार पडताळणीच्या कामात गुंतले आहेत. याशिवाय, 2 लाख कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहे. युतीचा अंतिम निर्णय हायस्कूल घेणार असला तरी, काँग्रेसने सर्व 403 जागांवर आपली संघटनात्मक बांधणी पूर्ण केली आहे.
प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी थेट शब्दांत भाजपमधील अंतर्गत वादावर बोट ठेवले. योगी आणि मोदींचे सध्या पटत नाहीये. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा पडला असून, लोक आता पैशांच्या जोरावरही भाजपला मतदान करणार नाहीत. राज्यातील ड्रग्ज आणि कफ सिरप माफियांना भाजपचेच संरक्षण आहे, असा खळबळजनक आरोप राय यांनी केला.
मुंबईत ‘उत्तर भारतीय’ फॅक्टरवर जोर
मुंबईतील 40 लाख उत्तर भारतीयांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने विशेष रणनिती आखली आहे. भाजप आणि इतर पक्षांनी या समाजाचा केवळ अपमानच केला, मात्र काँग्रेसनेच उत्तर भारतीयांना महापौर आणि मंत्रीपद देऊन सन्मान दिला, असा दावा पांडे यांनी केला. विशेष म्हणजे, राज ठाकरे आणि मनसेच्या फॅक्टरमुळेच काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत सावध भूमिका घेतल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.
अजय राय यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील प्रमुख मुद्दे:
1) स्थानिक निवडणुकांबाबत भूमिका: उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय राय यांनी महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य करताना महाविकास आघाडीच्या मजबुतीवर भर दिला. भाजपच्या विलंबाच्या धोरणावर टीका करत, लोकशाहीत स्थानिक निवडणुका वेळेवर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
2) कोडीनयुक्त कफ सिरप घोटाळ्याचा पर्दाफाश: कफ सिरपमधील अंमली पदार्थांच्या तस्करीचा आणि त्यातील कथित घोटाळ्याचा मुद्दा राय यांनी आक्रमकपणे मांडला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली, तसेच याचा तरुणांच्या आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली.
3) भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर प्रहार: भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षावर आणि सत्तासंघर्षावर त्यांनी निशाणा साधला. भाजपमधील गटबाजीमुळे प्रशासकीय कामांवर परिणाम होत असून, जनतेचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याचा दावा त्यांनी केला.
4) संघटनात्मक मजबुतीवर भर: आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधण्यावर आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर चर्चा केली.
