![]()
पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमधील ‘डी-झोन’ भागात असलेल्या भघेरिया केमिकल्स (पूर्वीचे झेनित केमिकल्स) या कंपनीत आज दुपारी 2 च्या सुमारास भीषण वायू गळतीची घटना घडली. ओलियम वायूची ही गळती इतकी तीव्र होती की, तिचे पडसाद सुमारे दीड किलोमीटर परिसरापर्यंत उमटले आहेत. या वायू गळतीमुळे परिसरातील कामगार आणि स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, अनेकांना श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांची जळजळ अशा शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीतील ओलियम साठवणूक करणाऱ्या टँक किंवा यंत्रणेतून ही गळती सुरू झाली. ओलियम हा वायू अत्यंत घातक असून हवेच्या संपर्कात येताच त्याचे रूपांतर सल्फर डाय ऑक्साईड आणि इतर सल्फरस ऑक्साईड्समध्ये झाले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे दाट लोट पसरले होते. सध्या प्रशासन आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत असून, नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गळती झाली त्यावेळी वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याने हा विषारी वायू अत्यंत वेगाने पसरला, ज्याचा मोठा फटका औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांमधील कामगार आणि लगतच्या निवासी भागातील नागरिकांना बसला आहे. साधारण दीड ते दोन किलोमीटरच्या विस्तीर्ण परिघात या वायूची तीव्रता प्रकर्षाने जाणवत असून, यामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना आवाहन पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी नागरिकांना आवाहन करताना मटले की, बोईसर एमआयडीसी, तारापूर येथे आज भागेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड येथे कारखान्यातील साठवण टाकीतून ओलियम वायूची गळती झाली आहे. हा वायू वातावरणात पसरल्यामुळे काही ठिकाणी पांढऱ्या धुरासारखा/धुक्यासारखा दिसू शकतो. नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कोणतीही घाईगडबड करू नये. कंपनीचे प्रतिनिधी तसेच संबंधित आपत्कालीन यंत्रणा व प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्परतेने कार्यरत आहे. या परिसरातील नागरिकांनी घराचे दरवाजे व खिडक्या बंद ठेवाव्यात. पंखे, एसी व इतर वायुविजन यंत्रणा तात्पुरत्या बंद ठेवाव्यात. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व श्वसनविकार असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. बाहेर पडताना नाक व तोंड ओल्या कापडाने झाकावे. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पालघरच्या तारापूर एमआयडीसीत वायू गळती!:हवेत पसरले लोट, नागरिकांमध्ये घबराट; साठवणूक टँकमधून ओलियमची गॅस लिक
