वॅलेंटीना इंडस्ट्रीजकडून ४३ कोटींची फसवणूक:आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी, दोन हजार गुंतवणूकदार बळी

0
275c43d7-9551-49e5-9db9-db1b3ce5868f_1776585028667.jpg




गुंतवणूकदारांना १ ते ५ टक्के मासिक व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वॅलेंटीना इंडस्ट्रीजच्या दोन संचालकांविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानी छापेमारी करत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. प्राथमिक तपासात फसवणुकीचा आकडा ४३ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. वॅलेंटीना इंडस्ट्रीजचे संतोष बांदल आणि ज्ञानेश्वर अनंत चोरगे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे कार्यालय कर्वे रोड परिसरातील सक्सेस स्क्वेअर इमारतीत आहे. आरोपींपैकी एक सॅलिसबरी पार्क येथे, तर दुसरा बिबवेवाडी परिसरात राहतो. आरोपींनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आकर्षक योजना तयार केल्या होत्या. कागदोपत्री १ टक्का, तर प्रत्यक्षात ५ टक्के परतावा देण्याचे खोटे आमिष दाखवून त्यांनी गुंतवणूकदारांकडून तब्बल ४३ कोटी २० लाख रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या. जुलै २०२२ ते एप्रिल २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. गुंतवणूकदारांना परतावा आणि मुद्दल देणे बंद केल्याने अनेकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या. या तक्रारींच्या आधारे अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शासनातर्फे अनियमित (अनधिकृत) ठेवी योजना बंदी कायदा, २०१९ च्या कलम २१ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात, पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले की, “गुन्हा दाखल झाल्यानंतर बांदल आणि चोरगे यांच्या कार्यालयावर व राहत्या घरी झाडाझडती घेण्यात आली. प्राथमिक चौकशीत किमान दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे.”

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks