विरोधकांच्या ताकदीपुढे मोदी सरकार अक्षरशः थंड पडले:भाजपची उलटगणती सुरू, MIM चा मोदींच्या संबोधनाचा दाखला देत दावा
![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून केलेले संबोधन पाहता विरोधकांच्या ताकदीपुढे केंद्र सरकार अक्षरशः थंड पडल्याचे स्पष्ट होते, अशी टीका एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केंद्रावर निशाणा साधताना केली आहे. सत्ताधारी भाजपची सत्तेतून उलटगणती सुरू झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित केले. पंतप्रधानांचे हे संबोधन, जे साधारणपणे अर्धा तास चालले, ते ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ या विषयावर केंद्रित होते. त्यात त्यांनी विरोधी पक्षांवर विशेषतः काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या या संबोधनानंतर आता त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एआयएमआयएमचे (AIMIM) नेते वारिस पठाण यांनी पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर सडकून टीका केली आहे. मोदींचे भाषण पाहता आता सत्ताधारी भाजपची सत्तेतील उलटगणती सुरू झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. भाजपची उलटगणती सुरू झाली वारिस पठाण रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र यांचे भाषण काही वेळच पाहिले. आता भाजपची उलटगणती सुरू झाली आहे. पंतप्रधानांचे रडगाणे व विलाप हे त्याचे द्योतक आहे. नेमक्या याच कारणामुळे मी त्यांचे भाषण बंद करून आयपीएल पाहण्याचा आस्वाद घेतला. याच सरकारने 2023 मध्ये 5 दिवसांचे अधिवेशन बोलावले होते. त्यात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा ते पारित करण्यात आले. हे विधेयक 2024 मध्ये लागू करण्याची गरज होती. पण त्यांनी ते केले नाही. आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पद्दुचेरी या 5 राज्यांत विधानसभेची निवडणूक सुरू आहे, असे ते सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हणाले. मोदींचे रडगाणे हा जनतेला मूर्ख बनवण्याचा फंडा माझ्या मते आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. याहून अधिक महिलाचा सन्मान काय असू शकतो? सरकारने हे विधेयक का आणले? त्यांचा हेतू काय आहे? हे जनतेला समजले आहे. त्यामुळे हे रडगाणे केवळ मूर्ख बनवण्याचे काम आहे. आज 12 वर्षांत पहिल्यांदाच भाजप सरकारने आणलेले एखादे विधेयक पडले आहे, असे वारिस पठाण यावेळी बोलताना म्हणाले. देशाच्या जनतेला वाटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संबोधनात देशाच्या विकासाची गोष्ट करती. पण त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की, ते घाबरलेले आहेत. विरोधकांची ताकद पाहून सरकार अक्षरशः थंड पडले आहे. नरमले आहे, असेही वारिस पठाण यावेळी बोलताना म्हणाले.
