![]()
मध्य आशियातील वाढत्या तणावामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आखाती देशांकडे जाणारी सर्व महत्त्वाची उड्डाणे तूर्तास स्थगित करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पुणे-दुबई आणि पुणे-अबू धाबी मार्गावरील विमानसेवा रद्द करण्यात आली असून, यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे हवाई वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. पुणे विमानतळावरून दररोज अनेक प्रवासी काम किंवा पर्यटनासाठी दुबई आणि अबू धाबीला जातात. मात्र, विमान कंपन्यांनी अचानक उड्डाणे रद्द केल्याने अनेक प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. कनेक्टिंग फ्लाईट्सची तिकिटे काढलेल्या प्रवाशांनाही आर्थिक फटका बसला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे संबंधित देशांच्या हवाई क्षेत्राचा वापर करणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विमान कंपन्यांनी आपली सेवा थांबवली आहे. काही विमानांचे मार्ग वळवण्यात आले होते, परंतु इंधनाचा वाढता वापर आणि वेळेचे गणित न जुळल्याने अखेर उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील आदेश येईपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावर तोडगा म्हणून काही कंपन्या प्रवाशांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत (रिफंड) करत आहेत, तर काही कंपन्या परिस्थिती निवळल्यानंतर प्रवासाची सवलत देत आहेत. तरीही, ऐनवेळी प्रवासाचा बेत रद्द झाल्याने प्रवाशांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला जाणारी एसजी ५१/५२ (पुणे-दुबई-पुणे) ही विमान फेरी ३ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच, ६ई १४८४/१४८३ (दुबई-पुणे-दुबई) ही फेरी देखील रद्द करण्यात आली आहे. याबाबत संबंधित विमान कंपन्यांनी प्रवाशांना कळवले आहे.
मध्य आशियातील तणाव; पुणे-आखाती देशांची सर्व उड्डाणे स्थगित:सुरक्षेच्या कारणास्तव दुबई, अबू धाबीकडे जाणाऱ्या विमानांवर परिणाम
