रासायनिक रंगांना फाटा!:'कला आणि आयुर्वेदा'च्या संगमातून आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रंगवली पर्यावरणपूरक होळी




कळमनुरी तालुक्यातील कवडा येथील मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळेतच पर्यावरणपूरक रंग तयार करून होळी व धुलीवंदनाचा सण सोमवारी ता. २ साजरा केला. यावेळी या विद्यार्थ्यांनी चक्क निसर्गाच्या साहित्यातून विविध रंग तयार करून ‘कला आणि आयुर्वेद’ यांचा सुरेख संगम घडवून आणला आहे. कवडा येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी व धुलीवंदन साजरे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शाळेेचे कला शिक्षक दिलीप दारव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. बाजारात मिळणाऱ्या घातक रासायनिक रंगांमुळे त्वचा आणि डोळ्यांना होणारी इजा टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील नैसर्गिक साधनांचा वापर करून विविध रंग तयार केले. यामध्ये हळद आणि बेसन यांच्या मिश्रणातून पिवळा रंग तयार केला तसेच पळसाच्या फुलांना पाण्यात उकळून आकर्षक भगवा आणि केशरी रंग तयार केला. पालकाच्या पानांचा रस आणि वाळलेल्या पाल्यापासून हिरवागार रंग तयार केला. बिटाच्या रसापासून गडद गुलाबी आणि लाल रंग तयार करण्यात आला. शाळेतच रंग तयार करून विद्यार्थ्यांनी होळी व धुलीवंदनाचा सणही साजरा केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ रंग निर्मितीच शिकायला मिळाली नाही, तर भारतीय सणांचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वही समजले. आयुर्वेदामध्ये पळस आणि हळद यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे या प्रयोगातून विद्यार्थ्यांनी अनुभवले. नवनिर्मितीचा आनंद घेत असतानाच विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेशही दिला आहे. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस, टी. वानखडे , सचिव सम्राट ढेपे, ए.बी.वानखेडे, संदिप ढेपे, हराळ, ढेगळे यांच्यासह गावकरी व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. या उपक्रमामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कल्पकतेला नवी दिशा मिळाली असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *