तळेगाव ठाकूर फाट्यावर चारचाकीची दुचाकीला धडक:दुचाकीस्वार युवक जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल




तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर फाट्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या अपघातात एक २२ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. आकाश तेलंगे असे जखमी युवकाचे नाव असून, त्याला उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. तिवसा येथून येणारी दुचाकी (एमएच २७, एएन ६०७०) रस्ता ओलांडत असताना, अमरावतीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने (एमएच ०८, झेड ९३२६) तिला धडक दिली. दिघी महल्ले येथील रहिवासी असलेला आकाश तेलंगे हा एका खाजगी कंपनीत काम करतो. काही महत्त्वाच्या कामासाठी तो तळेगाव ठाकूर येथे जात असताना हा अपघात झाला. अपघातावेळी त्याने हेल्मेट घातले असल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा टळली, मात्र त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमी युवकाला तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारांसाठी त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *