चांदूर बाजारात अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई:रेतीसह ट्रक जप्त करून आसेगाव पोलिसांच्या ताब्यात दिला




चांदूर बाजार तालुक्यात महसूल विभागाने अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत मौजा आसेगाव येथे अवैध रेतीची वाहतूक करणारा एक ट्रक जप्त करण्यात आला. ही कारवाई आसेगाव परिसरात महसूल पथकाद्वारे करण्यात आली. पथकाने अवैध रेतीसह ट्रक ताब्यात घेतला आणि पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी वाहन आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. घटनास्थळी ट्रक आणि त्यातील साहित्याचा पंचनामा करण्यात आला. गौण खनिज अधिनियमानुसार, जप्त केलेल्या मालाच्या पाचपट दंडाची तरतूद आहे. तसेच, अवैध उत्खनन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो. महसूल विभागाने यापुढेही अवैध रेती उपसा आणि विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. ही कारवाई प्रभारी तहसीलदार मनोज सोनारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी आसेगाव, विपुल ठाकरे आणि मोहन पाखरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *