एखाद्या देवस्थानावरील श्रद्धा इतकी दृढ असते की, त्या श्रद्धेतून दुसऱ्या ठिकाणीही मंदिराची उभारणी केली जाते. छत्रपती संभाजीनगरमधील बन्सीलाल नगर परिसरातील गिरिजा माता मंदिराची कहाणीही अशाच श्रद्धेशी जोडलेली आहे. म्हैसमाळ येथील गिरिजा मातेवरील श्रद्धेतून अग्रवाल कुटुंबाने शहरात या मंदिराची उभारणी केल्याचं सांगितलं जातं. आजही अग्रवाल कुटुंबाकडून मंदिराची देखभाल केली जाते. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे धार्मिक कार्यक्रमांसह दांडियाचा उत्साहही पाहायला मिळतो. मंदिराची स्थापना म्हैसमाळ येथील गिरिजा माता मंदिर हे परिसरातील जुन्या धार्मिक स्थळांपैकी एक असून, देवीच्या दर्शनासाठी येथे भाविक येतात. याच देवीवरील श्रद्धेतून छत्रपती संभाजीनगरमध्ये मंदिर उभारण्यात आल्याची माहिती सेवेकरी शरद जोशी यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंदिराची उभारणी साधारण 1970 च्या आसपास झाली असावी असे ते सांगतात. मंदिर परिसर भव्य असून येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. तसेच मंदिराच्या जवळच स्वामी समर्थांचं मंदिरही आहे. त्यामुळे या परिसरात धार्मिक श्रद्धेशी जोडलेली आणखी एक जागा भाविकांना अनुभवायला मिळते. एवढेच नाही तर येथे लक्ष्मीनारायनाणाचा देखील वास आहे. देवीची मूर्ती गिरीजा माता हे पार्वतीचे रूप मानले जाते. बन्सीलाल नगरमधील गिरिजा माता मंदिरातील देवीचं रूप भाविकांचं लक्ष वेधून घेतं. काळ्या रंगाची मूर्ती, उठावदार डोळे, नाकातील नथ आणि डोक्यावरचा उंच, कलाकुसर केलेला मुकुट यामुळे देवीचं स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण दिसतं. गळ्यातील विविध अलंकार, भरजरी वस्त्र आणि फुलांच्या माळांनी देवीला सजवण्यात येतं. मागील बाजूस असलेलं लाल वस्त्र मूर्तीला विशेष उठाव देतं. देवीच्या या देखण्या रूपातून मंदिरातील सजावटीची परंपरा आणि भाविकांची श्रद्धा अनुभवायला मिळते.
नवरात्रोत्सव हा मंदिरातील महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो. या काळात देवीची आरती, भजन यांसारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. परिसरात गुजराती आणि मारवाडी समाजाची वस्ती असल्याने नवरात्रात दांडियाचंही आयोजन केलं जातं. त्यामुळे देवीची भक्ती आणि पारंपरिक उत्सव यांची सांगड येथे पाहायला मिळते. मंदिराची देखभाल, नवरात्रातील धार्मिक कार्यक्रम आणि दांडियाच्या माध्यमातून जपली जाणारी उत्सव परंपरा यांमुळे गिरिजा माता मंदिर हे परिसरातील धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक भाग बनलं आहे.
