इतिहासात प्रथमच महिलेने मंत्र्याला एवढ्या शिव्या दिल्या:भाजपला लोक कंटाळलेत, काँग्रेसचे मंत्री महाजनांच्या व्हायरल व्हिडिओवर भाष्य
![]()
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंत्री गिरीश महाजन यांना महिलेने केलेल्या कथित शिविगाळीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला सत्तेचा माज आला आहे. सत्तेचा उपयोग जनतेला त्रास देण्यासाठी होत असल्यामुळे एका महिलेने काल एका मंत्र्याला भररस्त्यात शिविगाळ केली. इतिहासात प्रथमच एखाद्या मंत्र्याला महिलेच्या एवढ्या शिव्या खाव्या लागल्या, असे ते म्हणालेत. लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने सोमवारी मुंबईत एका मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जाऊन आपला संताप व्यक्त केला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या व्हिडिओवरून सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सीरियल लायर असल्याचा आरोप केला आहे. मोदी व फडणवीस सीरियल लायर नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सीरियल लायर अर्थात अट्टल खोटारडे आहेत. अशा विधानावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी असे वाटत नाही. खोटे बोलणाऱ्यालाच ते लागते. महिला विधेयकाविषयी ज्या पद्धतीने लोकांना भ्रमित करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक पारित झाले आहे. राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी झाली आहे. त्याचे नोटिफिकेशन जारी झाले आहे. हे विधेयक 2024 मध्ये लागू करण्यास तुम्हाला कुणी रोखले होते. आज 181 महिला सभागृहात पहायला मिळाल्या असत्या. सरकारने प्रथम सांगितले की, आम्ही जातनिहाय जनगणना करू. आता ते सांगत आहेत की, आता प्रथम आम्ही घरांची गणना करू. तुमच्याकडे महापालिका, नगरपंचायत, पंचायती, ग्राम पंचायत आदींमध्ये सर्व रेकॉर्ड आहे. त्यामुळे खोटे कोण बोलत आहे? बहुजनांवर सातत्याने अन्याय करणारी मानसिकता आज सत्तेत आहे. ही सत्तेतील मानसिकता बहुजनांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या खोटारड्या लोकांना जनतेने आता ओळखले आहे. भाजपला लोक आज कंटाळले आहेत. प्रथमच एखाद्या मंत्र्याने एवढ्या शिव्या खाल्ल्या नाना पटोले म्हणाले, मुंबईतील महिलेचा संताप हा भाजपच्या सत्तेच्या माजाचा परिणाम आहे. आमची सत्ता आहे. या सत्तेचे ज्या पद्धतीने दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो, याचे सर्वात मोठे उदाहरण काल फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून दिसून आला. सामान्य लोकांनी त्याला कसे ट्रोल केले. एक महिलाच त्यांना शिव्या घालत होती. महाराष्ट्रातील इतिहासात प्रथमच एखाद्या मंत्र्याला महिलेच्या एवढ्या शिव्या खाव्या लागल्या. राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून मुली व महिला बेपत्ता नाना पटोले यांनी यावेळी यवतमाळच नव्हे तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून महिला व मुली बेपत्ता होत असल्याचा दावा केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात केवळ यवतमाळच नव्हे तर अनेक जिल्ह्यांतून मुली बेपत्ता होत आहेत. नागपूर सारख्या शहरातूनही मुली बेपत्ता होत आहेत. त्याच्या तक्रारीही आहेत. तिथे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री राहतात. आज महाराष्ट्रातील हजारो महिला व मुली बेपत्ता आहेत. पण सरकार हे दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मुली असो किंवा महिला या महाराष्ट्रात त्यांचा सन्मान झाला पाहिजे. पण आज भाजप सरकारकडून महिलांचा सातत्याने अवमान होत आहे. ही वस्तुस्थिती आहे की, यवतमाळच नव्हे तर मुली व महिला बेपत्ता होत आहेत. पाक शांततादूत अन् आपले स्वयंभू विश्वगुरू प्रचारात व्यस्त नाना पटोले यांनी यावेळी पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. एवढ्या मोठमोठ्या घोषणा करणारा पंतप्रधान. मी सोडणार नाही वगैरे वगैरे… ऑपरेशन सिंदूरमध्ये 3 अतिरेकी मारले गेले. ते खरे आहे की खोटे आहे. आज जागतिक पातळीवर इराण, इस्त्रायल व अमेरिकेच्या युद्धात ज्या देशाने पाकला अतिरेकी राष्ट्र म्हणून घोषित केले होते, तोच पाकिस्तान आता शांततादूत म्हणून पुढे येत आहे. पण आपले स्वयंभू विश्वगुरू निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. या पंतप्रधानांनी अवघ्या भारताचीच मान खाली घातली आहे असे चित्र आहे. हा सत्तेचा माज आहे. यांना ना लोकशाही मान्य आहे, ना संविधान मान्य आहे. आम्हीच सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत ही भावना फडणवीस व भाजपच्या डोक्यात निर्माण झाली आहे. हा गर्व आहे. या गर्वाचे घर जनता निश्चितच खाली करेल, असे नाना पटोले म्हणाले.
