गुरुद्वारातील देणगी अपहार प्रकरणाने खळबळ; सेवादाराविरोधात गुन्हा दाखल

0
ChatGPT-Image-Apr-22-2026-11_06_44-AM.jpg


नांदेड (प्रतिनिधी)-  शीख धर्मियांचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारामध्ये देणगी रकमेच्या अपहाराचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुद्वारा प्रशासनाच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात संबंधित सेवादाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वारातील डोनेशन काउंटरवर कार्यरत असलेल्या सेवादाराने भाविकाने श्रद्धेने दिलेली 51 हजार रुपयांची देणगी अधिकृत खात्यात जमा न करता ती रक्कम स्वतःच्या खासगी बँक खात्यात वर्ग केल्याचा आरोप आहे. तसेच देणगीची अधिकृत पावती देताना रकमेची नोंद कमी दाखवून सुमारे 50 हजार रुपयांचा अपहार केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

गुरुद्वारा प्रशासनाने नियमित लेखापरीक्षणादरम्यान आर्थिक व्यवहारात विसंगती आढळल्याने अंतर्गत चौकशी सुरू केली होती. चौकशीत संबंधित कर्मचारी दोषी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक रवींद्रसिंघ नरेंद्रसिंघ कपूर यांनी तक्रार दाखल केली. धार्मिक संस्थेतील आर्थिक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणी वजीराबाद पोलिसांनी सेवादर रमनदीपसिंघ कमलजितसिंघ विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 316(5) व 318(4) अन्वये गुन्हा क्रमांक 189/2026 नोंदवून तपास सुरू केला आहे. आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची पडताळणी तसेच संबंधित दस्तऐवजांची तपासणी करण्यात येत असून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, गुरुद्वारा प्रशासनाने भाविकांचा विश्वास अबाधित राखण्यासाठी आर्थिक व्यवहारांवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याचे संकेत दिले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


Post Views: 30






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed