![]()
आंबेनळी घाटात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोका खाली व चिरेखिंडच्या वरती असलेल्या रस्त्यालगत एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह मोरीत कोंबून ठेवलेला असल्याचे उघडकीस आले असून ही घटना अत्यंत संशयास्पद आणि गंभीर स्वरूपाची मानली जात आहे. बुधवारी सकाळी आंबेनळी घाट रस्त्यावर दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी जाणवू लागली. संशय आल्याने त्यांनी रस्त्यालगत असलेल्या मोरीत डोकावून पाहिले असता त्यांना एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ पोलादपूर पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी जागेवरच फॉरेन्सिक व्हॅन आली आहे. प्राथमिक पाहणीत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत असून हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मोरीत टाकण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचे वय, ओळख व मृत्यूचे नेमके कारण याबाबत तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तसेच मागील काही दिवसांत बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारींच्या आधारे पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.
आंबेनळी घाटात थरार!:मोरीत आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; परिसरात एकच खळबळ
