![]()
चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसला मोठा हादरा बसला असून, चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अविनाश वारजूरकर आणि त्यांचे बंधू, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे या दोन्ही नेत्यांनी आपल्या राजीनामा पत्रात स्पष्ट केले आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील या दिग्गज वारजूरकर बंधूंच्या एक्झिटमुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या राजीनाम्यापूर्वीच वारजूरकर बंधूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. विशेष म्हणजे, चिमूरचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली होती, ज्यामुळे वारजूरकर बंधूंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. आता काँग्रेसचा अधिकृत त्याग केल्याने त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या आमदार बंटी भांगडिया यांनी सतीश वारजूरकर यांचा पराभव केला होता, त्यांच्याच पुढाकाराने आता हे नेते भाजपच्या तंबूत दाखल होत असल्याने चिमूरमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. हिंगोलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पाडत, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र आतिष दांडेगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी 8 वाजता नवी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असून, या निमित्ताने हिंगोलीतील राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्तेही दांडेगावकरांच्या समर्थनार्थ उपस्थित राहून मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठे भगदाड:दिग्गज वारजूरकर बंधूंचा 'हात' सोडून 'कमळा'कडे प्रवास; चिमूरच्या राजकारणात खळबळ
