जिल्हाधिकारी राहूल कर्डिले – VastavNEWSLive.com


·  कंधार तालुक्यात पानभोसी केंद्रावर पेपर संपेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती

·  जिल्ह्यात 98.24 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

·  जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरारी पथकामार्फत निगरानी

नांदेड – जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र विषयाची परीक्षा जिल्ह्यातील 109 केंद्रांवर आज सुरळीतपणे पार पडली. एकूण 21 हजार 937 परीक्षार्थ्यांपैकी 21 हजार 550 विद्यार्थी उपस्थित राहिले असून उपस्थितीचे प्रमाण 98.24 टक्के नोंदविण्यात आले.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेराच्या सहाय्याने संपूर्ण वेळ परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व 109 केंद्रांवर परीक्षा शांततापूर्ण व कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
कंधार तालुक्यात पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय या केंद्रास भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केली. ते या केंद्रावर पेपर संपेपर्यंत उपस्थित होते. त्यांच्यासमवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी हे देखील उपस्थित होते.

नायगाव तालुक्यात नरसी येथील राणी लक्ष्मीबाई कमवि येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी भेट दिली असता एक परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आला. संबंधित विद्यार्थ्यावर मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली. नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी यांनी माहूर येथील जगदंबा उच्च माध्यमिक‍ विद्यालय येथे भेट दिली असता एका विद्यार्थ्यावर गैरप्रकार प्रकरणी कारवाई करण्यात आली.
तसेच किनवट येथील दहेलीतांडा या परीक्षा केंद्राच्या बाहेर काही अज्ञात व्यक्ती आढळून आल्याने त्या ठिकाणी संबंधित व्यक्तींविरोधात सिंदखेड पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती दहेलीतांडा परीक्षा केंद्राचे संचालक यांनी दिली.

आज 25 फेब्रुवारी रोजी जीवशास्त्राच्या पेपरसाठी जिल्हास्तरावरील सुमारे 62 अधिकारी हे 62 केंद्रांवर पूर्णवेळ उपस्थित होते. शिक्षण विभागाचे 7 अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी अशा एकूण 40 व इतर अधिकाऱ्यांनी भरारी पथकांमार्फत 109 केंद्रांवर देखरेख ठेवली.
दहावी-बारावीच्या सर्व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होत असून विद्यार्थी व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. उर्वरित परीक्षा देखील अशाच पारदर्शक, शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.


Post Views: 114






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *