बोरीवलीत 'बिश्नोई' टोळीच्या नावे खंडणी:सराफाकडे 30 लाखांची मागणी; मुंबई पोलिसांनी रचला सापळा अन् चौघांना ठोकल्या बेड्या




मुंबईच्या बोरीवली परिसरात एका सराफ व्यापाऱ्याला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे भासवून 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी व्हॉट्सअ‍ॅप कॉल आणि मेसेजद्वारे व्यापाऱ्याशी संपर्क साधून खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या टोळीचा छडा लावत चौघांना जेरबंद केले आहे. सराफ व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर तातडीने हालचाली करत बोरीवली पोलिसांनी माहिम येथे सापळा रचून रियाजुद्दीन बशीरला ताब्यात घेतले आणि त्यानंतर वांद्रे व जोगेश्वरी परिसरातून त्याच्या आणखी तीन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल जप्त करण्यात आले असून, धमकी देणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सध्या बोरीवली पोलिसांकडून सुरू आहे. मुंबईच्या बोरीवली परिसरातील एका सराफ व्यापाऱ्याला 18 ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप कॉल आणि संदेशांद्वारे 30 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बोरीवली पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तांत्रिक तपास केला आणि आरोपींना जाळ्यात ओढण्यासाठी एक योजना आखली. पोलिसांनी आरोपींशी संवाद साधून खंडणीची रक्कम रोख स्वरूपात न देता सोन्याच्या नाण्यांच्या स्वरूपात देण्याचे मान्य केले आणि त्यानुसार माहिम परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे सोन्याची नाणी स्वीकारण्यासाठी आलेल्या 29 वर्षीय रियाजुद्दीन मोहम्मद बशीर याला पोलिसांनी माहिम पश्चिम येथून रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वांद्रे आणि जोगेश्वरी पश्चिम परिसरात छापे टाकून आणखी तीन साथीदारांना अटक केली. हे सर्व आरोपी मूळचे झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील वासेपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीवली पोलिसांचे पथक कसून तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *