![]()
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की यामध्ये पाचही प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले असून, या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रकचा अत्यंत भीषण अपघात झाला असून, यामध्ये श्रीरामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान बालकांचा समावेश असून, या हृदयद्रावक घटनेत अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबावर काळाने घाला घातल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव-कोळगाव रस्त्यावरील माऊली मंदिराजवळ काल पहाटे तीनच्या सुमारास ट्रक आणि इको कार यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत एकाच कुटुंबातील तिघांसह कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक अपघातात नितीन कोकाटे (चालक), गजानन पायघन, ध्रुपता पायघन आणि वैभव पायघन यांनी आपले प्राण गमावले असून, 13 वर्षीय करण पायघन हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर काळाचा घाला!:भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा
