आकाशवाणी परिसरात 'चड्डी-बनियान' गँगचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न:सीसीटीव्हीमध्ये कैद, अज्ञात आरोपीचा शोध सुरू
![]()
छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी परिसरात एका अज्ञात चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ‘चड्डी-बनियान’ परिधान केलेल्या या चोरट्याचा प्रयत्न फसला असला तरी, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने आकाशवाणी परिसरातील एका एटीएम सेंटरला लक्ष्य केले. त्याने ओळखी लपवण्यासाठी तोंडाला रुमाल बांधला होता आणि तो केवळ चड्डी व बनियानवर होता. एटीएममध्ये प्रवेश करताच त्याने सर्वप्रथम दिवे बंद केले. त्यानंतर चोरट्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रोख रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला. त्याने मशीनवर अनेकदा प्रहार केले, मात्र एटीएमची सुरक्षा व्यवस्था मजबूत असल्याने त्याला यश आले नाही. मशीन न फुटल्याने चोरट्याला रिकाम्या हाताने पळ काढावा लागला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवाहर नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या असून, त्या आधारे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
