मालेगाव मनपाच्या विद्युत विभागात नमाज पठण:: सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्रीांकडे तक्रार; राजकीय वाद पेटला




मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागात नागरिकांनी सामूहिक नमाज अदा केल्याची घटना समोर आली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शहरात तसेच राज्याच्या राजकारणात चर्चा रंगल्या आहेत. मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याबाबत महानगरपालिकेकडे निवेदन दिले होते. मात्र, समस्येची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत त्या प्रभागातील नागरिकांनी थेट महापालिकेच्या विद्युत विभागात ठिय्या आंदोलन सुरू केले. या संदर्भात अधिकाऱ्यांनी दुपारी तीन वाजता बैठकीचे बोलावणे दिल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. प्रभागातील वीज समस्येवर चर्चा करण्यासाठी अधिकारी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, संबंधित अधिकारी बैठकीला आलेच नाहीत. नागरिकांनी काही काळ प्रतीक्षा केली. दरम्यान रमजानचा महिना सुरू असल्याने सायंकाळच्या नमाजाची वेळ झाली. आम्ही कार्यालयातून बाहेर पडलो असतो, तर आमची समस्या प्रलंबितच राहिली असती आणि अधिकारी निघून गेले असते, असे आंदोलकांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी विद्युत विभागाच्या कार्यालयातच नमाज अदा केल्याचे सांगितले. किरिट सोमैया यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. भाजप नेते किरिट सोमैया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. महापालिका वीज विभागाच्या कार्यालयात जाहीरपणे नमाज अदा करण्यात आल्याचे नमूद करत, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पालिका आणि पोलिसांनी ही घटना घडल्याचे मान्य केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. सोमैया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, आत्ता मालेगाव महापालिका कार्यालयात नमाज, असे नमूद केले. काही महापालिका कर्मचारी आणि नागरिकांनी मिळून वीज विभागाच्या कार्यालयात जाहीररित्या नमाज अदा केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्रीांकडे केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रकरणाला अधिक राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. कठोर पावले उचलावीत – आमदार अतुल भातखळकर दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महापालिका कार्यालयात नमाज अदा करणे हे बेकायदेशीर असून संविधानाच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारने तात्काळ कारवाई करावी, तसेच नमाज आयोजित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. एकीकडे आंदोलकांनी वीज समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग अवलंबल्याचे सांगितले असले, तरी दुसरीकडे या घटनेमुळे कायदा व प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मालेगाव शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *