नाशिक TCS प्रकरणातील पीडितेची आपबीती:म्हणाली – आरोपीने लग्नाची गोष्ट लपवली, मला रिसॉर्टवर नेऊन बळजबरीने अत्याचार केला

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-19t14_1776589432.png




नाशिक येथील टीसीएस कंपनीत घडलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आता अत्यंत खळबळजनक माहिती पुढे येत आहे. पीडितांपैकी एका तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने आपले लग्न झाल्याची गोष्ट लपवून तिच्याशी जबरदस्थीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. पीडितेने पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत आरोपी व आपली ओळख 4 वर्षांपूर्वी झाल्याचे सांगितले आहे. महाविद्यालयात एकत्र शिकत असताना त्यांच्यात मैत्री झाली होती. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टीसीएसमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. जुलै 2022 मध्ये त्याने पीडितेवर पहिल्यांदा बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचे अगोदरच लग्न झाले होते. पण त्याने ही वस्तुस्थिती लपवून पीडितेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. काही काळानंतर पीडितेला टीसीएसच्या नाशिक येथील युनिटमध्ये नोकरी मिळाली. तेव्हा आरोपीही तिथे कार्यरत होता. ऑगस्ट 2024 मध्ये आरोपी पीडितेला एका रिसॉर्टवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीच्या पत्नीनेच पीडितेशी साधला संपर्क या घटनेनंतर फेब्रुवारी 2026 मध्ये पीडितेला आरोपी विवाहित असल्याची व त्याला 2 मुले असल्याची बाब समजली. ही माहिती मिळताच तिच्या पायाखालची वाळू सरकली. विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीने स्वतः पीडितेशी संपर्क साधून तिला ही माहिती दिली. त्यानंतर पीडितेने या प्रकरणी आरोपीला जाब विचारला. तेव्हा त्याने स्पष्ट् केले की, त्याचा तिच्याशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नव्हता. कारण, तो अगोदरच विवाहित होता. पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपी हा आपल्या इतर 2 सहकाऱ्यांसोबत कंपनीच्या उपहारगृहात तिच्याशी वारंवार भेटत होता. हे तिघे मिळून अनेकदा देवदेवतांविषयी अवमानकारक शेरेबाजी करत होते. आरोपी तरुणाने आपल्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. त्याच्यासह त्याच्या इतर सहकाऱ्यांनी माझे लैंगिक शोषण केले. मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. निदा खान अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात दुसरीकडे, या प्रकरणातील अन्य एक संशयित निदा खान हिने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या सोमवारी सुनावणी होणार आहे. निदाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला आहे की, एका महिलेवर दुसऱ्या महिलेच्या विनयभंगाचा आरोप ठेवता येत नाही. शिवाय, निदा खान 2 महिन्यांची गर्भवती असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. जामीन मंजूर करण्यासाठी हे तथ्य एक आधार म्हणून सादर करण्यात आले आहे. निदा खान सध्या फरार आहे. तिच्या शोधासाठी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात पोलिसांचे एक पथक तळ ठोकून आहे. टीसीएसची काय आहे भूमिका? टीसीएसने शुक्रवारी स्पष्ट केले की, निदा खान ही कंपनीमध्ये ‘एचआर मॅनेजर’ (HR Manager) या पदावर कार्यरत नव्हती. प्राथमिक चौकशीच्या आधारे, कंपनीला ‘नैतिकता’ (Ethics) किंवा ‘POSH’ (लैंगिक छळ प्रतिबंधक) यंत्रणांद्वारे अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. कंपनीने पुढे असेही नमूद केले की, ते या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहेत; यासाठी एका देखरेख समितीची (Oversight Panel) स्थापना करण्यात आली आहे. तपासात मदत करण्यासाठी बाह्य संस्थांचीही (External Agencies) मदत घेतली जात आहे. कोणत्याही प्रकारची सक्ती, छळवणूक किंवा गैरवर्तन याबाबत कंपनीच्या धोरणात ‘शून्य सहनशीलता’ (Zero Tolerance) बाळगली जाते. पीडितेला अश्लील मेसेज पाठवल्याचे स्पष्ट न्यायालयाने या प्रकरणातील रजा मेमन व शफी शेख या 2 अन्य सहआरोपींची पोलिस कोठडीत 20 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप संभाषणांतून (चॅट्समधून) असे उघड झाले की, आरोपींनी पीडितेला अश्लील संदेश पाठवले होते आणि त्याद्वारे तिच्या विनयभंगाचा प्रयत्न केला होता. लैंगिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या तक्रारींनंतर, नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणी एकूण 9 एफआयआर (FIR) दाखल केले आहेत. तसेच या संदर्भात 8 जणांना अटकही करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एका उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी या प्रकरणाची अत्यंत सखोल व सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश दिले. राज्यात धर्मांतराशी संबंधित घटना कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यामुळे या घटनेच्या चौकशीत कोणत्याही पैलूकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी, असे ते म्हणालेत. हे प्रकरण उजेडात आणल्याप्रकरणी त्यांनी नाशिक पोलिसांचे कौतुकही केले.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks