नांदेड : लोहा येथे केंद्रप्रमुख ३ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

नांदेड (प्रतिनिधी) – तालुका लोहा येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत केंद्रप्रमुख दिगंबर रामचंद्र शिंदे (वय 57) यांना ३ हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिपर्यंत सुरू होती.

तक्रारदार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाद्रा (ता. लोहा, जि. नांदेड) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इ.स. 2018 मध्ये घेतलेल्या 46 दिवसांच्या अर्जित रजेच्या मंजुरीसाठी दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी पंचायत समिती लोहा येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता.

दि. 11 फेब्रुवारी रोजी रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी गेले असता, संबंधित कार्यालयाकडून रजा मंजुरीसाठी 4 हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. दि. 13 फेब्रुवारी रोजी मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तक्रारदाराला मुख्याध्यापक पदाचा पदभार घेण्यास सांगण्यात आले.

यानंतर केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे यांनी तक्रारदाराचा पाठलाग करून “२-३ हजार रुपये द्या, तुमची रजा मंजूर करून देतो,” अशी मागणी केली. रक्कम कधी द्यायची यावर “उद्या द्या, परवा द्या, तुमच्या सोयीने द्या,” असे उत्तर त्यांनी दिले.

दि. 16 फेब्रुवारी रोजी तक्रारदार शासकीय पंचासह 3 हजार रुपयांची लाच देण्यासाठी गेले असता, शिंदे यांनी ती रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान एक मोबाईल फोन व 2700 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून त्यांच्या घराची झडतीही सुरू आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक अनिता चव्हाण यांच्या तक्रारीवरून दिगंबर रामचंद्र शिंदे (मूळ नेमणूक – जि.प. शाळा लिसलगाव, ता. लोहा; सध्या – गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती लोहा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे करीत आहेत. ही सापळा कारवाई एसीबीच्या पथकातील पोलीस अंमलदार संतोष वच्चेवार, गजानन राऊत, राजेश राठोड, प्रकाश मामुलवाड आणि ईश्वर जाधव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *