नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाणे यांच्या हद्दीत एका महिलेशी अभद्र वर्तन करून जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या 34 वर्षीय आरोपीला अवघ्या 24 तासांत अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास पूर्ण करत दोषारोपपत्र सादर केल्याने या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महिला पोलीस अंमलदार सविता मनोहर केळगंद्रे यांनी दिलेल्या अहवालानुसार, 12 फेब्रुवारी रोजी नागेश अनंतराव दुबे (वय 34, रा. गणेशनगर, नांदेड, व्यवसाय – खाजगी चालक) याने एका महिलेला वारंवार त्रास देत तिच्याशी अभद्र वर्तन केले. तू मला खूप आवडतेस, आपण दोघे फिरायला जाऊ असे म्हणत त्याने वाईट उद्देशाने इशारे केले. संबंधित महिलेची इच्छा नसतानाही तिच्याशी जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आरोपी महिलेचा पाठलाग करत होता, तिला धक्काबुक्की करत होता तसेच माझ्याशी बोलली नाहीस तर जीवे मारीन अशी धमकी देत होता. या प्रकाराबाबत भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 79/2026 दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष तांबे व पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलीस अंमलदार सविता केळगंद्रे व पोलीस अंमलदार मुंडे यांनी अत्यंत वेगाने तपासाची सूत्रे हाताळत कायद्यानुसार आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. 13 फेब्रुवारी रोजी आरोपी नागेश दुबे याला न्यायालयात हजर करून त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. महिलेच्या तक्रारीची तातडीने दखल घेत भाग्यनगर पोलिसांनी दाखवलेली ही कार्यक्षमता आणि तत्परता प्रशंसनीय ठरत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी घेतलेली ही ठोस भूमिका समाजात सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.
Post Views: 387
