स्वारातीम विद्यापीठ ‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’मध्ये देशात १२ व्या क्रमांकावर


*९२.५ गुणांसह ‘गोल्ड रेटिंग’; आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आय टी व केंद्रीय विद्यापीठांशी स्पर्धेत उल्लेखनीय यश*

नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावरील ‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’ (National Green University Ranking-NGUR) २०२६ मध्ये १०० पैकी ९२.५ गुण मिळवत देशात १२ वा क्रमांक पटकावला आहे. ‘ग्रीन मेंटर्स’ (Green Mentors) या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशातील आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आय टी, केंद्रीय विद्यापीठे तसेच अन्य प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थांचा सहभाग असताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मिळविलेले हे यश विशेष अभिमानास्पद मानले जात आहे.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यापीठाला न्यूयॉर्क येथे आयोजित ‘10th NYC Green School Conference 2026’ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्याचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील सार्वजनिक अकृषिक विद्यापीठांच्या श्रेणीतील या क्रमवारीत स्थान मिळविणारे हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे.

‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’ २०२६ मध्ये विद्यापीठांचे मूल्यमापन केवळ हरित परिसर किंवा वृक्षसंवर्धनापुरते मर्यादित न ठेवता पुराव्यांवर आधारित आणि सर्वांगीण पद्धतीने करण्यात आले. पर्यावरणीय प्रशासन (Sustainability Governance), जैवविविधता, Carbon & Climate Action, Green Infrastructure व ऊर्जाक्षमता, संशोधन, अभ्यासक्रम, जलव्यवस्थापन, शाश्वत वाहतूक, कचराव्यवस्थापन व Circular Economy तसेच सामुदायिक सहभाग या दहा प्रमुख स्तंभांवर विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले.

‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’च्या निकषांनुसार ९० ते ९४.९९ गुणांना ‘Gold Rating’ प्रदान करण्यात येते. स्वारातीम विद्यापीठाने ९२.५ गुण मिळवत ही प्रतिष्ठेची Gold Rating प्राप्त केली आहे. विद्यापीठाच्या पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित धोरणांप्रती असलेल्या दृढ बांधिलकीची ही राष्ट्रीय पातळीवरील प्रभावी पावती मानली जात आहे.

हरित विद्यापीठाच्या दिशेने विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत विविध महत्त्वपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले आहेत. विद्यापीठ परिसरात २८७ KWH क्षमतेचे सौर पॅनेल्स बसविण्यात आले असून त्यातून विद्यापीठाच्या एकूण वीज गरजेपैकी सुमारे ४० टक्के गरज भागविली जात आहे. परिसरात सुमारे ३५ हजार वृक्षांची लागवड, १० हेक्टर क्षेत्रावर Biodiversity Park, ४ हेक्टर क्षेत्रात Botanical Garden, Rain Water Harvesting प्रणाली आणि सुमारे ५५० एकरांचा हरित परिसर ही विद्यापीठाच्या पर्यावरणपूरक वाटचालीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

यासोबतच कचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे शाश्वत पृथक्करण व पुनर्वापर, पर्यावरणीय अभ्यासक्रम, SDG-संरेखित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश, Green Technology वरील संशोधन प्रकल्प, पर्यावरणीय अभ्यास आणि शाश्वत कृषी यांसारखे विविध उपक्रम विद्यापीठात राबविण्यात येत आहेत.

‘हरित विद्यापीठ’ म्हणजे केवळ मोठ्या प्रमाणात झाडे असलेला परिसर नव्हे, तर पर्यावरणपूरक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी, ऊर्जा कार्यक्षमता, जलसंवर्धन, कचराव्यवस्थापन, जैवविविधतेचे संरक्षण, SDGs चा अभ्यासक्रमात समावेश, हरित तंत्रज्ञानावरील संशोधन आणि पर्यावरणीय जनजागृती यांचा समग्र दृष्टिकोन होय. स्वारातीम विद्यापीठाने या सर्व बाबींचा समन्वय साधत शाश्वत विकासाची भक्कम पायाभरणी केली आहे.

“उत्कृष्टता आणि टिकाऊपणा हे हातात हात घालून चालतात,” हे विद्यापीठाने आपल्या कार्यातून सिद्ध केले असल्याचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी सांगितले. हे यश संपूर्ण विद्यापीठ परिवारासाठी अभिमानाचा क्षण असून, विद्यापीठातील प्रत्येक सदस्याच्या अथक परिश्रम, समर्पण आणि तळमळीमुळेच ही कामगिरी शक्य झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

या यशासाठी योगदान देणाऱ्या सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे विद्यापीठाची जबाबदारीही वाढली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“ही केवळ सुरुवात आहे. येत्या काळात विद्यापीठ १०० टक्के हरित ऊर्जा आणि Net-Zero च्या दिशेने अधिक ठोस पावले उचलणार असून, भविष्यात यापेक्षाही अधिक उंची गाठण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील,” असा विश्वास कुलगुरू डॉ. चासकर यांनी व्यक्त केला.

या उल्लेखनीय यशामध्ये कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या नेतृत्वाखाली प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर डी. पवार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (IQAC) संचालक तथा NGUR 2026 चे नोडल अधिकारी डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, हरित विद्यापीठ उपक्रमाचे समन्वयक डॉ. अविनाश कदम, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर, सहा. कुलसचिव रामदास पेदेवाड तसेच उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

राष्ट्रीय हरित विद्यापीठ उभारणीचा हा प्रवास एका दिवसात साध्य झालेला नसून, अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण नियोजन, दूरदृष्टी आणि सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. या हरित विकासाची भक्कम पायाभरणी करण्यात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि माजी कुलसचिव सर्जेराव शिंदे यांच्या कार्यकाळातील योगदानही उल्लेखनीय आहे. वृक्षसंवर्धन, जैवविविधता, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासासाठी कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या योगदानातून विद्यापीठाची हरित वाटचाल अधिक बळकट झाली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या या अभूतपूर्व राष्ट्रीय यशाबद्दल अधिसभा, व्यवस्थापन परिषद (Management Council) आणि विद्यापरिषद (Academic Council) यांच्या सर्व सदस्यांनी कुलगुरू, विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच हरित उपक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या संपूर्ण विद्यापीठ परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय स्तरावर प्राप्त झालेली ही गौरवशाली कामगिरी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाभिमुख कार्यपद्धतीची साक्ष असून, भविष्यातही पर्यावरण संवर्धन, हरित ऊर्जा, जैवविविधता आणि Net-Zero च्या दिशेने अधिक प्रभावी उपक्रम राबवून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी उंची गाठावी, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Post Views: 100






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *