![]()
दर्यापूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे नुकतेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समता नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे शिबिर पार पडले. महिला व बालकल्याण उपसभापती मंगला तराळे यांनी शिबिराचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी नगरसेवक प्रदीप मलिये आणि नगरसेविका रमा सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपसभापती मंगला तराळे यांनी उपस्थित महिलांना नगरपालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या शिबिराचा मुख्य उद्देश महिलांना सरकारी योजनांची माहिती देणे हा होता. कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि पालिकेचे कर्मचारी विलास घोगरे व कुणाल गिऱ्हे यांनी विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये पीएम स्वनिधी योजना, आयुष्मान कार्ड, इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजना, महिला व पुरुष बचत गट योजना, श्रमयोगी मानधन योजना, अपंग निधी योजना आणि जीवनोन्नती अभियान अंतर्गत वैयक्तिक व सामाईक कर्ज योजना यांचा समावेश होता. याप्रसंगी निवृत्त कृषी अधिकारी राजाभाऊ तराळे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबद्दल माहिती दिली. शिबिराचे संचालन मेघा माहुरे यांनी केले, तर मनीषा गजभिये यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला बचत गटातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दर्यापूर न.प. महिला व बालकल्याण विभागातर्फे मार्गदर्शन शिबिर:विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजन
