![]()
पुणे शहर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांना मिळणारा आर्थिक पुरवठा रोखण्यासाठी ‘ऑपरेशन म्यूल हंट’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १३२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १५२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या किंवा भाड्याने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या बँक खात्यांवर कठोर कारवाई करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र सायबरच्या समन्वयाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईचा विस्तार राज्यातील इतर जिल्ह्यांपर्यंत करण्यात आला आहे. समन्वय पोर्टलच्या माध्यमातून इतर राज्यांतून आलेल्या १,७०५ नोटिसांवर कार्यवाही सुरू आहे, तर पुण्यातून इतर राज्यांतील संशयितांना २,०९९ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तपासादरम्यान पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि इतर ठिकाणांहून आरोपींना अटक करून संबंधित प्रकरणांमध्ये दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. सायबर पोलिसांकडून म्यूल खातेदारांचे आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड, डिजिटल व्यवहार आणि बँक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. सायबर गुन्हेगारांना आर्थिक मदत केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तींवर सहआरोपी म्हणूनही कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, ओटीपी, सिम कार्ड, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार किंवा पॅन कार्डची माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारे माहिती किंवा खाते उपलब्ध करून दिल्यास संबंधित व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, २०२६ मध्ये पुणे शहरात १,१४२ जनजागृती कार्यक्रमांद्वारे सुमारे तीन लाख नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यात आला आहे. सायबर गुन्ह्यांबाबत माहिती असल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहनही पुणे पोलिसांनी केले आहे.
पुणे पोलिसांकडून 'ऑपरेशन म्यूल हंट' मोहीम हाती:132 गुन्हे दाखल, 152 आरोपींना अटक, आर्थिक पुरवठा रोखणार
