सातारा जिल्ह्यात पावसाची शंभरी पार:सरासरीच्या 103.4 टक्के पर्जन्यवृष्टी; सातारा, पाटण व माण तालुके अजूनही सरासरीच्या प्रतिक्षेत




जुलै महिन्याच्या अखेरीस सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन करत समाधानकारक हजेरी लावली आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ५१८.३ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती सरासरीच्या १०३.४ टक्के आहे. केवळ ३१ जुलै रोजी जिल्ह्यात २८ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांसह धरणांच्या पाणीसाठ्याबाबत दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात खंडाळा तालुक्याने सर्वाधिक १७६.७ टक्के पावसाची नोंद करत आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ वाई (१५४.२%), फलटण (१२६.८%), कऱ्हाड (११४.९%), खटाव (११२.२%) आणि जावळी (१३०.४%) या तालुक्यांमध्येही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दुसरीकडे, सातारा (८५.८%), पाटण (८१.४%), माण (७३.१%), महाबळेश्वर (८१.९%) या तालुक्यांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून, पुढील काही दिवसांच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर कोरेगाव तालुक्यात ९४.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यात १ जूनपासून २,५४९.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्यातील महाबळेश्वर शहरातच ४,६३८.५ मिमी पाऊस झाला आहे. जावळी तालुक्यातील बामणोली येथे १,५१०.६ मिमी, तर पाटण तालुक्यातील हेलवाक येथे १,५६७.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पर्जन्यमान (१ जून ते ३१ जुलै) हवामान विभागाच्या अधिकृत नोंदीनुसार, सातारा जिल्ह्याने जुलै अखेर सरासरी पावसाचा टप्पा ओलांडला असला, तरी तालुकानिहाय पर्जन्यमानात मोठी तफावत कायम आहे. त्यामुळे आगामी ऑगस्टमधील पावसावर खरीप हंगामाचे पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे तीन फुटांवर उचलणार कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळी मध्ये सातत्याने वाढ होत आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सध्या कोयना धरणाचे सहा दरवाजे दोन फूट वर उचललेले आहेत व त्यातून पाण्याचा विसर्ग कोयना नदीमध्ये सुरू आहे. आता रात्री दहा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटावरून तीन फुटापर्यंत उघडून 16 हजार 535 क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे आता रात्री दहा वाजल्यानंतर कोयना नदीमध्ये एकूण 17 525 क्युसेक विसर्ग सुरू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *